श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिराचे नूतनीकरणाचे काम करतांना मंदिराचे पावित्र्य अबाधित रहावे 

 महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समविचारी संघटनांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

तुळजापूर ,दि .०२

श्री तुळजाभवानी मंदिर येथे श्री क्षेत्र तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये श्री भवानी मातेच्या मंदिरातील अत्यंत पुरातन, पवित्र, स्थापत्यशास्र, धर्मशस्रसानुसार असलेला श्री भवानी मातेचा गाभारा जाणीवपूर्वक अयोग्य हेतूने नूतनीकरण केला जात आहे आणि रचना पालटली जात असल्याचे आरोप करुन मंदिराची वास्तू ही भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संग्रहित आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन होतांना मूळ गाभ्याला कोणताही प्रकारचा धक्का लागू नये. मंदिरात पूर्वीपासून ज्या प्रथा-परंपरा चालू आहेत त्या जतन केल्या जाव्यात, तसेच कुलाचारासाठी सुयोजित जागा मंदिरात असाव्यात. मंदिरातील प्रवेश हा मुख्य द्वारातूनच असावा आणि मंदिराचे पावित्र्य अबाधित रहावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघ, समविचारी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि श्री तुळजाभवानीदेवी मंदिर समितीकडे देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी स्वीकारले. 

यावेळी दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज, सोमवार गिरी मठाचे महंत इच्छागिरी महाराज, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अमरराजे कदम, पाळीकरी पुजारी संघटनेचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे,  उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अनंत कोंडो, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी बोधले, महाराष्ट्र राज्य भारतीय व्यवस्था परिवर्तन (निर्माण) चळवळीचे श्री. संजय सोनवणे, महाराष्ट्र मंदिर महासंघ जिल्हा संघटक विनोद रसाळ सर्वोत्तम जेवळीकर, तसेच सर्वश्री अमोल कुतवळ, शाम पवार, बाळासाहेब शामराज, परीक्षीत साळुंखे, संजय मैंदंर्गे, श्रीराम अपसिंगकर, सुदर्शन वाघमारे, नागेश शास्त्री अंबुलगे, तानाजी कदम, महेश चोपदार आदी उपस्थित होते. 
काही महिन्यांपूर्वी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मंदिर संस्थानने जुने बांधकामांना नवीन रूप देण्यासाठी संवर्धनाचे काम चालू केले; परंतु पुरातन वास्तूंचे रूप पुरातत्व खात्याने नवीन करून टाकले. दगडांना घासून- त्यामध्ये चुना आणि मसाला भरून हे काम केले. असे करत असताना मूळ बांधकाम कमकुवत केले जात आहे, असे लक्षात येते. 

श्री तुळजाभवानी मातेचा मुख्य गाभार्‍याचे काम सुरू असताना अचानक पुरात्व विभागाने गाभार्‍यातील शीळांना तडे गेल्याचे सांगितले. या संदर्भात प्रसारमाध्यमांनीही बातम्या दिल्या आहेत. श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍याच्यावर वर्ष १९९३ मध्ये बांधकाम करून त्यावर गोपूर आणि कळस याचे बांधकाम केले. हे बांधकाम करण्याच्या अगोदरच सध्याचे अस्तित्वात असलेले प्राचीन बांधकामाला ते वजन झेपणार का ? याचा अभ्यास केलाच नाही असे दिसून येते आणि आता पुरातत्व विभाग शिळांना तडे गेल्याचे सांगत आहे. यातून मंदिर समितीची आणि बांधकाम करणार्‍याची दायित्वशून्यता लक्षात येते.  

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या

१. अयोध्येतील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे बांधकाम केले तेव्हा जी पद्धत वापरली होती आणि जो रचनेच्या संदर्भातील अभ्यास केलेला होता तसा अभ्यास श्री तुळजाभवानी मंदिराची रचना करतांना धार्मिक अभ्यासक यांचे मत घ्यावे. मंदिराचे बांधकाम करतांना ते मॉलसारखे करू नये.
२. गर्भगृहांची  रचना, आतमध्ये प्रवेश करण्यासाठीची प्रवेशद्वारे यांचे आकार किती असावेत याविषयीचा परिपूर्ण अभ्यास मंदिरांच्या वास्तू रचनेत केलेला आहे, यासंदर्भात मंदिर समितीने धर्माचार्‍यांचे मत घेतले आहे का ? याचा खुलासा करावा.
३. केवळ भाविकांना दर्शन व्हावे म्हणून हवे तेवढा गाभारा मोठा करणे किंवा प्रवेशदार मोठे करणे हे धर्मशास्राला विसंगत आहे. तथापि मंदिराच्या सध्याच्या अस्तित्वात असलेल्या आराखड्याला आणि बांधकामाला कोणत्याही प्रकारची इजा न होता ते पूर्ण व्हावे आणि कोणतीही रचना करत असतांना त्या संदर्भात धर्मशास्त्राच्या  अनुषंगाने धर्माचार्‍यांचे मत घेऊनच करावे. 
४. मंदिराचे संवर्धन करतांना अन्य मंदिरे मुख्य मंदिराच्या पाठीमागे जाता कामा नयेत.
५. मंदिरे ही भक्तांच्या कह्यात असली पाहिजेत आणि त्याचे व्यवस्थापन हे भक्तांच्याच कह्यात हवे. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण रहित करावे.  

श्री तुळजाभवानी मंदिर संरक्षण कृती समितीच्या माध्यमातून लढा देणार !

श्री तुळजाभवानी मंदिर संरक्षण कृती समितीच्या माध्यमातून सर्व पुजारी, व्यापारी, भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांची एकत्रित बैठक पार पडली. श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा राबवतांना श्री भवानी देवीच्या संदर्भातील पवित्र धर्म परंपरा अबाधित रहाव्यात यासाठी संघटित प्रयत्न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विकास आराखड्याअंतर्गत मंदिर आणि मंदिराबाहेर नेमक्या कोणत्या सुधारणा करणार आहेत ते मंदिर संस्थानने स्थानिकांना स्पष्ट करावे, तसेच त्याची लिखित स्वरुपात माहिती प्रशासनाने द्यावी. यासाठी प्रशासनासमवेत संवाद साधणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top