नळदुर्ग महाविदयालयातील प्रा.डॉ. उध्दव भाले यांना संशोधनातील भारतीय पेटंट

 नळदुर्ग,दि.०२: प्रा. दिपक जगदाळे 

येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. उध्दव भाले यांना वनसपतीच्या मुळावर असणाऱ्या मायकोरायझा नावाच्या बुरशी ह्या शेतीसाठी  विशेषतः  उत्पादन वाढीसाठी कशा उपयुक्त असू शकतात ,याबर आधारीत "मातीतून पोर्टेबल मायकोरायझल बुरशी शोधणारे उपकरण" हे भारतीय पेटंट नुकतेच मिळाले आहे. 

 आपल्या शेतातील काही बुरशी ह्या शेतीसाठी किती महत्वाच्या असतात अशा अनुशंगाचे संशोधन डॉ भाले हे सातत्याने  करीत असतात, त्यांचे आतापर्यंत १७० पेक्षा जास्त शोध निबंध राष्ट्रीय  आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झालेले आहेत.

सत्तर पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १२ विद्यार्थ्यांनी पीएच. डी.पदवी संपादन केली आहे आणि सद्या ७ विद्यार्थ्यांचे संशोधन चालू आहे. त्याचबरोबर त्यानी युजीसी, डीएसटी चे प्रकल्पही पूर्ण केलेले आहेत.

त्यांचे संशोधन हे पिकावरील पडणाऱ्या रोगांचे एकात्मिक पद्धतीने निमूर्लन आणि पिकांची सेंद्रीय पद्धतीने वाढ  होऊन उत्पादन क्षमता कशी वाढली पाहिजे यावर आधारीतआहे. त्यांच्या या संशोधनामुळे २०२२-२३ पासून सातत्याने मागील तीन वर्षापासून जागतिक शास्त्रज्ञाच्या यादीतही त्यांना नामांकन प्राप्त झालेले आहे. त्याच  संशोधनाच्या आधारावरील हे भारतीय पेटंट मिळाले आहे. हे पेटंट वनस्पतीशास्त्र विभाग कला विज्ञान आणि वाणिज्य महाविदयालय  नळदुर्ग आणि चन्नाबश्वेश्वर फॉर्मसी महाविदयालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ( एमओयु) अंतर्गत प्रा डॉ उध्दव भाले आणि प्रा डॉ ओमप्रकाश भुसनुरे यांच्या सहयोगाने पूर्ण झालेले आहे.   

त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, कार्यालयीन अधिक्षक  धनंजय पाटील आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा महाविद्यालयात सत्कारही करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी कॅबीनेट मंत्री मधुकरराव चव्हाण, सचिव  उल्हास बोरगांवकर आणि संस्थेच्या  संचालकानी व गावातील नागरिकांनी अभिनंदन केले.
 
Top