मुरुम शहरात बालदिंडीने भक्तिरसाचा संग; लहानग्यांच्या हावभावांनी मंत्रमुग्ध ; विद्यार्थ्यांनी विविध संत वेशभूषेतून साकारला भक्तिभाव, पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
मुरूम, ता. उमरगा, दि.०६ :
येथील गुरुकुल प्री प्रायमरी स्कूल, शांतिनिकेतन विद्यामंदिर आणि नूतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत पारंपरिक भक्तिपथदिंडीचे सुंदर दर्शन घडवले. विविध संत व साधूंच्या वेशभूषेत साकारलेल्या या बालदिंडीत लहानग्यांनी भक्तिभाव, निरागसता आणि सांस्कृतिक जाणीवेचा संगम घडवला. गुरुकुल प्री-प्रायमरी स्कूलच्या बालदिंडीची सुरुवात शाळेपासून झाली. ही दिंडी छत्रपती संभाजीनगर मार्गे अक्कलकोट रोड, शिवाजी महाराज चौकापर्यंत नेण्यात आली आणि तेथून पुन्हा शाळेत परत आणण्यात आली. विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा नाम घोष करत मार्गक्रमण केले. त्यांच्या टाळांच्या निनादाने परिसर भक्तिरसात न्हाल्यासारखा वाटत होता. शांतिनिकेतन विद्यामंदिरच्या बालदिंडीने शाळेपासून शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, अण्णाभाऊ साठे चौक ते हनुमान चौक असा विस्तारित मार्ग घेतला. दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी नृत्य, फुगडी, टाळ-मृदंग यांच्या साथीने वातावरण उत्साहमय ठेवले. प्रतिभा निकेतन इंग्लिश मिडीयम व नूतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुरुम शहरातील पारंपरिक मिरवणूक मार्गावरून ग्राम प्रदक्षिणा करत भक्तिपरंपरेचा वारसा जपला. बालदिंडी पाहण्यासाठी शहरवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. लहानग्यांचे वेश, चेहरे, हावभाव आणि टाळ-चिपळ्यांच्या तालावर केलेले पदन्यास पाहून अनेक नागरिक भारावून गेले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचा, तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी आपल्या मुलांच्या सहभागाचा आनंद व्यक्त करत असे उपक्रम मुलांमध्ये भक्तिभाव, सामाजिक ऐक्य, परंपरेचे महत्त्व आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव निर्माण करतात, असे मत व्यक्त केले. शहरातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या या बालदिंडीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय, प्रसन्न आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. लहानग्यांनी साकारलेल्या या भक्तिप्रवासातून संस्कारांची सळसळ, नव्या पिढीतील श्रद्धा व संस्कृतीच्या बीजांची पेरणी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील विविध शाळेतील बालकांनी संत वेशभूषेतून साकारला भक्तिभाव..