नळदुर्ग व परिसराला अतीवृषटीचा जोरदार फटका ; महामार्गावर पाणी आल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आदेश
नळदुर्ग, दि.२७ : शिवाजी नाईक
गेले चार ते पाच दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर मंगळवारी रात्री १० वाजता तुफान मुसळधार पावसाने नळदुर्ग व परिसराला जोरदार झोडपून काढले. झालेल्या अतीवृष्टीमुळे महामार्गावर प्रचंड पाणी आल्याने तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली तर शेतात पाणी साचल्याने उडीद, युग , सोयाबीनसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.दरम्यान याची माहिती मिळताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महसुली यंत्रणेस पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
नळदुर्ग शहरासह परिसरात मंगळवार दि. २६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या मुसळधार पावसास सुरुवात झाल्यानंतर बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी सकाळी आठपर्यंत नळदुर्ग शहरात प्रथमच सर्वाधिक ९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
दि.२६ ऑगस्ट अखेर पर्यंत नळदुर्ग शहरात ९०० हि.मी पावसाची नोंद
मे महिन्यात ३६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, जून मध्ये १४९ मिलिमीटर, जुलै १३३ मिलिमीटर, ऑगस्टपर्यंत दिनांक २६ ऑगस्ट पर्यंत २५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा म्हणजेच एकूण ९०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सोलापूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टा पाटी( ता. तुळजापूर) ते उमरगा जाणा-या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे प्रचंड पाणी आले. त्यास तलावाचे स्वरुप आल्याने महामार्गावरील वाहतूकीचा पार खोळंबा झाला. महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. तब्बल दोन तासांनी म्हणजे रात्री १२ वाजता पाणी ओसरल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली.
अतिवृष्टी झालेल्या मंडळातील शेतकऱ्यांनी जिओ टॅग केलेला फोटो, आधार कार्ड व बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रति तयार ठेवणे आवश्यक आहे. पंचनामे करण्यास गुरुवार दि.२८ रोजी पासून सुरुवात करण्यात येणार आहे.- विश्वास वायचळ, महसूल अधिकारी नळदुर्ग.
आमदार राणाजगजितसिंह पाटील
जळकोट आणि नळदुर्ग मंडळातील ३६ गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच तहसीलदारांना तात्काळ पंचनामे सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शेतकरी बांधवांनी जागरूक राहून पंचनाम्याच्या कामावर लक्ष ठेवावे. आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या संपूर्ण प्रक्रियेत आवश्यक मदत करत आहेत.
यसोबतच या परिसरातील काही शेजारच्या गावांमध्ये शेतात पाणी साचले असल्यास, पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याचेही पंचनामे तातडीने करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
रामतीर्थ येथे घरात शिरले पाणी
मंगळवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टीमुळे होवून रामतीर्थ या.तुळजापूर येथिल नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे जळकोट ते लोहगाव रस्त्याची उंची वाढविल्याने गावात पाणी शिरले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.