नवी दिल्ली सांस्कृतिक महोत्सवात झळकली महाराष्ट्राची लोकपरंपरा; धाराशिव जिल्ह्यातील पथकात दोघांचा सहभाग
नळदुर्ग,दि.२६ : डॉ. दिपक जगदाळे
नवी दिल्ली येथील सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग, CCRT) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत अनुस्थापन पाठ्यक्रम या विषयांतर्गत सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध पारंपरिक लोककलांनी आणि नृत्यप्रकारांनी नवी दिल्ली मधील आणि देशभरातील तेरा राज्यातील रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. महाराष्ट्राच्या या चमुत धाराशिव जिल्ह्यातील दोन कलाकारांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या समृद्ध वारसा असलेले सादरीकरण पीपीटी द्वारे झाले. त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास पेहराव,खाद्य संस्कृती, प्रेक्षणीय स्थळे, विविध क्षेत्रातील महान व्यक्ती, नद्या, पर्वत रांगा, इत्यादींची माहिती देण्यात आली. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाला.
या कार्यक्रमांमध्ये लावणी, वाघ्या मुरळी, गोंधळ, धनगर, कोळी नृत्य यांचे दिमाखदार सादरीकरण झाले. कलाकारांच्या रंगतदार पोशाखांनी, पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण सभागृह भारावून गेले. सर्वच नृत्यांमुळे सभागृहात उत्साहाची लाट पसरली. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाची ओळख इतर राज्यांपर्यंत पोहोचवणे हा होता. CCRT, नवी दिल्लीचे अध्यक्ष विनोद इंदुरकर, उपनिदेशक डॉ. राहुल कुमार तसेच चंद्रमौळी त्रिपाठी यांनी या कलाकारांचे कौतुक केले.
या सर्व नृत्यांचे दिग्दर्शन नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ. सचिन देवद्वारे यांनी केले. सादरीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणेच्या वतीने तुळजापूर येथील डॉ. सचिन देवद्वारे, उमरगा येथील गोविंद जाधव, अमरावती येथील छाया पोटेकर,लातूर येथील पांडुरंग येलमाटे व शिवाजी तुपकर, धुळे येथील राहुल पवार यांची निवड करण्यात आली होती.