तुळजापूरकर पानीपत शूरवीर मराठ्यांचा आत्मास शांती लाभण्यासाठी पानिपत येथे करणार पितृविधी!
तुळजापूर,दि.२४:
हरियाणातील पानीपत येथे झालेल्या भीषण युद्धात शूरमरण पत्करलेल्या लाखो मराठ्यांच्या आत्म्यांना शांती लाभावी यासाठी तुळजापूरकर थेट पानीपत गाठणार आहेत. विजय गंगणे मित्र मंडळ या उपक्रमाचे आयोजन करीत असून, पितृपक्ष पंधरवाड्यातील पितृविधी यावेळी पानीपत शहीद स्मारक स्थळी पार पाडले जाणार आहेत.
माजी सभापती विजय गंगणे म्हणाले,
“आपल्या घरातील पूर्वजांसाठी आपण पितृपक्षात विधी करतो. पण पानीपतच्या युद्धात बलिदान दिलेल्या आपल्या मराठा शूरवीरांसाठी आजवर कोणी असा विधी केला नाही. हे वीर आपलेच पूर्वज आहेत, म्हणून त्यांच्यासाठीही पितृविधी करून आत्मशांतीची प्रार्थना करणार आहोत.” यात पानीपत येथील मराठ्यांना सहभागी करुन घेणार आहोत.
हा उपक्रम कोणत्याही पक्षसंघटनेचा नसून मानवतेच्या भावनेतून व इतिहासप्रेमातून केला जात असल्याचे गंगणे यांनी स्पष्ट केले. यासाठी लवकरच तुळजापूरकरांचे पथक पानीपत गाठून संपूर्ण नियोजन करणार आहे