मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी  २५ हजार "लाडक्या भावां"चे येत्या २५ ऑगस्ट रोजी चक्काजाम आंदोलन 


    नागपूर,दि.२२ :

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनांतर्गत लाडक्या भावाचे विविध मागण्यासाठी  नागपूरातील संविधान चौकात "चक्काजाम"  आंदोलन येत्या २५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे राज्य अध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, अनुप चव्हाण व प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेत  लाडक्या भावांचा राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीचा निषेध म्हणून नागपूरातील संविधान चौकात २५ ऑगस्ट रोजी २५ हजार "लाडके भाऊ" चक्काजाम आंदोलन करणार आहेत. राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेच्या माध्यमातून दिलेले निवडणूकिसाठीच दिलेले आश्वासन होते की काय ? असा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना पडला असल्याचा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

   राज्यात मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाखो महिलांना १ हजार ५०० रुपये दरमहा दिल्यावर त्यांना खुश करीत नंतर लाडक्या भावाचे काय हा प्रश्न  उपस्थित केल्याने लाडक्या भावालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, अशा प्रकारची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री  यांनी करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना घोषीत करीत  लाक्षावधी तरुणांना प्रतिवर्षी कौशल्य विभागांतर्गत शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण देऊन त्याच आस्थापनेमध्ये कायम करू अशा प्रकारची घोषणा करण्यात आल्याचे यावेळी सांगितले . 

या घोषणेनंतर राज्यातील इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी आपली आहे ती पोटा पाण्याची नोकरी सोडून शासकीय नोकरी मिळत आहे,केवळ या आशेपोटी शासनाच्या राज्यातील विविध आस्थापनामध्ये १ लाख ३४ हजार तरुणांनी आवेदन केले आणि ११ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

   राज्य सरकार या योजनेचे "लाडक्या भावाला" अर्थातच प्रशिक्षणार्थ्यांना ११ महिन्याचे प्रमाणपत्र देणार आहे.हे प्रमाणपत्र घेऊन कुठे जायचे. हे मात्र कुणीच सांगत नाही,कारण या प्रमाणपत्राला कुठेही कवडीचीही किंमत नाही. शासकीय आस्थापनेमध्ये काम केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना बाहेर कोणीही नोकरी देणार नाही. यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये चार महिने अनेक आंदोलने झाली. परंतु राज्य सरकार याकडे काहीच लक्ष देत नाही. याचा निषेध म्हणून संपूर्ण राज्यातील लाडके भाऊ येत्या २५ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

 आंदोलनातील विविध मागण्या पुढीलप्रमाणे 

१) एक लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थ्यांना नियमित कायमस्वरूपी रोजगार द्यावा, प्रशिक्षणार्थ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करावी, ज्या दिवशी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी रुजू झाला, त्या दिवसापासून वयोमर्यादा  गृहीत धरण्यात यावी, ह्या मागण्या मान्य करण्यात येवून त्या अंमलात आणाव्यात ह्यासाठी  सकाळी दहा वाजता नागपूर शहरातील संविधान चौकात "चक्काजाम आंदोलन" करून याविषयी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात  येत  असल्याचे सांगितले. 
 
Top