नगरपालिका निवडणूकीच्या सुधारीत प्रभाग रचना प्रारूप आराखड्याबाबत ४ हरकती दाखल
नळदुर्ग, दि.०१:
नळदुर्ग नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचना प्रारूप आराखडा १८ ऑगस्ट रोजी जाहिर केले असून त्या बाबत राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, नागरिक व इच्छुकांकडून ३१ ऑगस्ट पर्यंत लेखी हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार अखेरच्या दिवसापर्यंत ४ हरकती न.प.कार्यालयात दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी दिली.
हरकती अनुषंगाने चार तक्रारी प्राप्त झाल्या असुन शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांनी प्रभाग क्रमांक दोन व तीन करीता हरकत घेत दोन अर्ज दाखल केले आहे. त्याचबरोबर भाजपचे नळदुर्ग मंडल अध्यक्ष बसवराज धरणे यांनी प्रभाग क्रमांक ४ व ८ यासाठी हरकत घेतलेली आहे.
सदरील हरकतीच्या सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे प्रभाग ९ मधील शेख असलाम कचरु यांनी नगरपालिकेने प्रसिद्ध केलेला प्रारूप आराखडा योग्य असल्याचे सांगून त्यात कोणताही बदल करू नये असे सांगितल्याने निवडणूक पूर्व चर्चेला उधाण आले आहे.
नगरपालिकेने प्रभाग भौगोलिक आराखडा जाहीर करताना दिलेल्या सिमांकन खुना व गल्लीचे नाव विचारात घेता काही प्रभागातील गल्लीतील रहिवासी दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झालेले आहेत. त्यावर नगरपालीकेने सकारात्मक विचार करून सुधारित प्रारूप आराखडा तयार करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.