अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

तुळजापूर,दि.३१:

नागराज मंजुळे दिग्दर्शित सुप्रसिद्ध सैराट या मराठी चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. सैराट मधील 'आर्ची' या गाजलेल्या कथानकातून त्या मराठी प्रेक्षकांना परिचित आहेत.

रिंकू राजगुरू या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहरातील रहिवासी असून, २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटामधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. आर्ची या भूमिकेमुळे रिंकू यांनी अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.

आज त्यांनी कुलधर्म कुलाचार पार पाडत देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीची ओटी भरून आरती केली.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देत अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
 
Top