नळदुर्ग,दि.१६ :
बंजारा समाजास एस.टी.आरक्षण मिळण्याकरिता समाज बांधवानी शिस्तबध्द व न्यायिक पध्दतीने लढा देण्याचे आवश्यक असुन कोणीही टोकाचे पाऊल उचलु नये असे आवाहन करत राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस पत्र देवुन याप्रकरणी सहकार्य करण्याचा आग्रह करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुरुम (नाईक नगर) येथे आश्वासन दिले.
बंजारा समाजास आरक्षण मिळावे याकरिता उमरगा तालुक्यातील नाईक नगर (मुरुम) येथे शनिवारी आत्महत्या केलेल्या पवन चव्हाण यांच्या कुटूंबियांची भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री तथा भाजप लातुर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी सोमवार दि.१५ सप्टेंबर रोजी भेट देवुन सांत्वन केले .
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चव्हाण कुटूंबास आर्थिक मदत करुन आपण सदैव बंजारा समाजाच्या पाठीशी असल्याचे सांगून शासन स्तरावरून चव्हाण कुटुंबास मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मयत पवनयांची पत्नी कृपाली पवन चव्हाण, आई द्रोपदी चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, जेष्ठ नेते माणिकराव राठोड , तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड , विद्यानंद राठोड , वसंत पवार, दामाजी राठोड, माजी नगरसेवक निरंजन राठोड , सरपंच युवराज राठोड, दिनेश राठोड, योगेश राठोड, सुरज चव्हाण, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.