रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटी आयोजित आदर्श गणेश मंडळ पुरस्कार वितरण सोहळा; किसान गणेश मंडळाचा शहरातून प्रथम क्रमांक
मुरुम, ता. उमरगा, दि. २५ :
शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आदर्श गणेश मंडळ पुरस्कार २०२५ वितरण सोहळा शहरातील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या सभागृहात बुधवारी रोजी पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, पतसंस्थेचे सचिव शरणाप्पा मुदकन्ना, रोटरीचे सचिव कल्लप्पा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शिवशरण वरनाळे, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. संदीप दहिफळे यांनी मनोगते व्यक्त केले.
यावेळी डॉ. महेश मोटे म्हणाले की, गणेशोत्सव हा केवळ भक्तीभाव व्यक्त करण्याचा सोहळा नसून सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधन यांचा मिलाफ आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सामाजिक,आरोग्यविषयक जनजागृतीपर उपक्रम, शिस्तबद्ध मिरवणूक या गोष्टींमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो. आज गौरव झालेली मंडळे ही भाविकांसाठी आदर्श ठरावीत, अशी अपेक्षा आहे. निवड समितीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, प्रबोधनात्मक देखावे, आकर्षक सजावट, सामाजिक उपक्रम, नागरिकांचे प्रबोधन, शिस्तबद्ध मिरवणूक, बालकलाकारांचे नृत्य यासारख्या विविध निकषांवर मंडळांचे मूल्यमापन करून पारितोषिकांची निवड केली. यामध्ये शहरातून प्रथम क्रमांकाचा मान किसान चौक येथील किसान गणेश मंडळांनी पटकावला, द्वितीय क्रमांक सोनार गल्ली येथील श्रीराम गणेश मंडळ तर तृतीय क्रमांक अशोक गणेश मंडळ यांना मिळाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ढाल भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक संतोष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल राठोड तर आभार कलाप्पा पाटील यांनी केले. यावेळी शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो मुरूम, ता. उमरगा येथील रोटरी क्लबच्या वतीने किसान गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना प्रथम पारितोषिक देताना संदीप दहिफळे, आप्पासाहेब सुर्यवंशी, शिवशरण वरनाळे, शरणाप्पा मुदकन्ना व अन्य.