मुसळधार पावसामुळे ओढ्याला पुर ; गुळहळ्ळी गावाचे शनिवारी संपर्क तुटले ,जनजिवन विस्कळीत , प्रशासनाने  उपाययोजना करण्याची मागणी 

नळदुर्ग,दि.२८ :

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी येथे ओढ्याला पुर आल्याने शनिवारी दिवसभर संपर्क तुटला. रविवारी सकाळी पाणी ओसरले. कांहीं दिवसापुर्वी सुध्दा अतीवृष्टीने गावातील घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. दरम्यान दि.२७ सप्टेंबर रोजी शहापुर, दहिटणा या गावास अपर जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. मात्र गुळहळ्ळी गावाचे संपर्क तुटल्याने या गावास भेट देता आले नसल्याचे समजते.
 गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गुळहळ्ळी ता तुळजापूर येथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून गावाचा  संपर्क तुटला आहे. गावाच्या मुख्य मार्गावर असलेला ओढा  दुथडी भरून वाहत असल्याने, नागरिक रोजचा प्रवास करताना जीव मुठीत घेऊन तो ओलांडताना दिसत आहे.. प्रशासनाने या  समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी अशी ग्रामस्थातुन  मागणी होत आहे.

अतिवृष्टीमुळे ओढ्यावर असलेला पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की, गावाचा बाहेरील जगाशी असलेला संपर्क तुटला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय मदत, किराणा दुकान, दळण, दळण्यासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना अत्यंत धोकादायक परिस्थितीत हा ओढा ओलांडावा लागत आहे. या जीवघेण्या प्रवासमुळे शाळकरी मुले, नोकरदार आणि शेतकरी यांना दररोज धोकादायक पद्धतीने पाणी ओलांडून जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा वेग इतका जास्त आहे की, घसरून पडण्याचा आणि वाहून जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला शहरात किंवा जवळच्या दवाखान्यात घेऊन जाणे जवळपास अशक्य झाले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला आणि वृद्धांना हा ओढा ओलांडणे अत्यंत कठीण झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची जिल्हाधिकारी कार्यालयाने आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने तातडीने दखल घ्यावी. नागरिकांच्या मूलभूत सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष भविष्यात एका मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते. जीवघेणा प्रवास थांबवून प्रशासनाने तातडीने पाऊले उचलाण्याची मागणी प्रतिष्ठित नागरिक योगेश हांजगे यांनी केली आहे.
 
Top