अणदूर येथील आठवडी बाजारातील  विक्रेते व बाजारकरुंना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी 

अणदुर,दि.२७ :

तुळजापूर तालुक्यातीलअणदूर येथील आठवडी बाजारातील  विक्रेते व बाजारकरुंना कोणत्याही सुविधा नसल्याने विक्रेत्यांसह बाजरकरुंची ससेहोलपट सुरु आहे.याकरिता सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

अणदूर येथे दर गुरुवारी आठवडी  बाजार राईसमील मैदानावर भरतो. याठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध  नसल्याचे दिसून येत आहे.परंतू विक्रेत्यांकडून कर वसुली मात्र सुरु असल्याने व्यापारी बांधवामध्ये नाराजी आहे. पाऊस पडला की बस स्थानकापासूनचे पाणी गटार नसल्याने दिशा मिळेल तिकडे घुसते .त्यातील बहुतांश पाणी,शासकीय दवाखाना,जिल्हा परिषद कन्या शाळा व अर्ध्या बाजारात घुसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अक्षरशः चिखलात व पाण्यात भाजीपाला विक्री करावी लागत आहे. तर नागरिकांनी तुडवीत गेलेल्या दुषीत चिखल पाण्यातील भाजीपाला खरेदी करण्याची वेळ आली आहे. बाजारात व्यापाऱ्यांना बसण्यासाठी ना बाजार ओट्यांची सोय ना स्वच्छता गृहाची सोय, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. जिथे आडोसा मिळेल तिथे बाजारकरी व व्यापारी नैसर्गिक विधी उरकतात.परिणामी दुर्गंधी पसरुन परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.कांही विक्रेत्यांना कर भरुनही नाईलाजाने स्वखर्चाने मुरुम टाकून येणारे पाणी रोखण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

परिसरातील जवळपास २५ गावातील नागरिक व विक्रेते बाजारात येतात. तेव्हा ग्रामपंचायतीने बाजार ओटे उभारुन, स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे.
 
Top