मुसळधार पावसात वीज पडून वासरू मृत्यूमुखी; नदीच्या पुरात दोन म्हशी वाहुन गेल्या; शहापूर गावाचा संपर्क तुटला, अपर जिल्हाधिकारी यांची भेट
नळदुर्ग,दि.२७ :
शुक्रवारी रात्री वीजाचा कडकडाट, मेघगर्जनेसह नळदुर्ग व परिसरात जोरदार मुसळधार पाऊस झाला. या पावसातच पहाटे ४:३० वाजण्याच्या दरम्यान दहिटणा ता.तुळजापूर शिवारात पहाटे पुर्वी वीज पडून म्हशीचे वासरु दगावले तर दोन म्हशी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.तर पूर आल्याने नळदुर्ग अक्कलकोट मार्गावरील शहापूर गावाचा संपर्क तुटला. दरम्यान शनिवार रोजी अपर जिल्हाधिकारी स्वाती पाटील यांनी भेट दिली.
तुळजापूर तालुक्यातील शहापूर व दहिटणा या गावास अपर जिल्हाधिकारी व भाजपच्या पदाधिका-यांनी भेट देवुन परिस्थिती जाणुन घेतली. शहापूर गावाचा संपर्क पुलावरील पाण्यामुळे तुटला होता. दहिटणा गावात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे दोन जनावरे वाहून गेली असून अप्पासाहेब पाटील या शेतकऱ्याचे
एक वासरू वीज पडून मृत्यूमुखी पडले आहे.तर अप्पासाहेब पाटील, मल्लिनाथ बिराजदार यांच्या म्हशी नदीच्या पुरात वाहून गेल्याची माहिती तलाठी एम.एस गायकवाड यांनी सांगितले.
आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी सुरक्षित रहावे. कसलीही अडचण असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क करावा अशा सूचना अपर जिल्हाधिकारी यांनी दिल्या.सदरील घटनेचा तलाठी एम.एस. गायकवाड यांनी पंचनामा केला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड, राज्य परिषदेचे सदस्य सिध्देश्वर कोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के,भिवा इंगोले, महादेव सालगे आदिंसह भाजप पदाधिकाऱ्यांनी वरील गावास भेट देवुन माहिती घेतली. यावेळी दहिटणाचे सरपंच शिवकांता कांबळे, तुळजापूरचे तहसिलदार अरविंद बोळंगे, नळदुर्गचे अपर तहसिलदार प्रमोद गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी महेश मोकाटे, मंडळ अधिकारी पवन भोकरे,अमर गांधले, कृषी साहाय्यक उषाताई कार्ले शेतकरी बांधव, ग्रा.प. सदस्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.