नळदुर्ग शहरातुन संचलन; पथसंचलनातून संघ साधना अन राष्ट्रभक्तीची प्रेरणा
नळदुर्ग,दि.१६:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ऐतिहासिक शताब्दी निमित्त नळदुर्ग शहरातुन बुधवार दि.१५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्वयंसेवकांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. या संचलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशक्तीचे दर्शन झाले.
पथसंचलनातून शंभर वर्षांची लॉट, संघसाधना व राष्ट्रभक्तीची प्रेरणा नागरिकांनी अनुभवली. स्वयंसेवकांनी शिस्तबध्द पध्दतीने नळदुर्ग शहरातील बालाघाट कॉलेज येथुन व्यासनगर, बसस्थानक, शास्त्री चौक, जय भवानी चौक, सावरकर, चौक, गवळी गल्ली, मराठा गल्ली, ऐतिहासिक किल्ला गेट, चावडी चौक मार्गे श्री अंबाबाई मंदिर सभागृह येथे संचलनाची सांगता करण्यात आली यावेळी विजयादशमीचा उत्सव झाला.
शहरातील विविध मार्गावरून संघाची शिस्त, एकजूट, राष्ट्रनिष्ठा याचे दर्शन या संचलनाच्या माध्यमातून नागरिकांना घडले. मध्यभागी ध्वजरक्षक स्वयंसेवकांसह मध्यभागी भगवा ध्वज त्यापुढे व पाठीमागे स्वयंसेवक होते.
शताब्दीनिमित्त संचलनाद्वारे सामाजिक बांधिलकी व मूल्यांचा प्रसार देशातील शेवटच्या घटकांपर्यंत करण्यास सुरुवात झाली आहे. यातून सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरी शिष्टाचार या पंचसूत्रीबाबत आगामी काळात कर्तव्य करण्याचा संदेश देण्यात आला. प्रत्येक स्वयंसेवकाने आपापल्या क्षेत्रात सक्रिय राहून समाज परिवर्तनाचे काम करावे, हा या संचलनाचा मुख्य संदेश वक्त्यांनी मांडला
संघ स्थापनेच्या शताब्दीनिमित्त पंचसूत्री कार्यक्रमांची सुरुवात या संचलनापासून झाली. खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट या गणवेशातील स्वयंसेवकांनी संचलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हभप शिवाजी चव्हाण, प्रमुख वक्ते म्हणून धाराशिव जिल्हा संघचालक अँड रविंद्र कदम यांनी सहभाग घेतला. तसेच यावेळी शस्त्र पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा समारोप श्री अंबाबाई मंदिर सभागृह येथे झाले. प्रारंभी तुळजापूर तालुका कार्यवाह ऑड. धनंजय धरणे यांनी प्रास्ताविक केले.