ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांचे निधन


नळदुर्ग,दि.०३ डिसेंबर 

राष्ट्रसेवादलाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ   समाजवादी विचारवंत, नळदुर्ग येथील "आपलं घर" प्रकल्पाचे आधारवड,असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान पन्नालाल भाऊ सुराणा यांचे मंगळवारी रात्री निधन झाले आहे.

 ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा  यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे मंगळवारी रात्री साडे आठ वाजता धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील'आपलं घर'  प्रकल्पात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रभास आणि कन्या आरती असा परिवार आहे.

साथी पन्नालाल सुराणा हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे. शाळेत असताना ते राष्ट्रसेवादलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून व समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले.

महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली. मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते. साथी सुराणा यांचा व्यासंग दांडगा होता. शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले.

आज होणार देहदान

साथी पन्नालाल सुराणा यांचे आपलं घर येथे निधन झाल्यानंतर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या  सुमारास त्यांचा पार्थिव देह 
सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयास देहदानासाठी नेण्यात आला. बुधवारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे देहदान होणार आहे.

त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवर चाळीस पुस्तके लिहिली आहेत. दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. भूमिमुक्ती आंदोलनात त्यांना चार वेळा तुरुंगवास झाला. लातूर भूकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी नळदुर्ग येथे'आपलं घर' ही शाळा सुरू केली. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.

पत्नी डॉ. वीणाताई यांच्या समवेत त्यांचे बिहारमध्येच वास्तव होते. त्यानंतर समाजवादी पक्षात त्यांनी काम केले. जनता पक्षाचेही ते नंतर प्रदेश सचिव होते. बार्शी येथील विधानसभा निवडणूक व सोलापूरची लोकसभा निवडणूक त्यांनी लढविली होती.

सन २०१५ मध्ये नळदुर्ग शहरातील बहुतांश कुटुंबियांची न.प. प्रशासनाने राहती घरे पाडून उध्वस्त करत बेघर केले . पिडित कुटुंबास न्याया मिळण्याकरिता  त्यांनी  न डगमगता वयाच्या ८३ व्या वर्षी प्रशासनाविरुध्द लढा दिला.नळदुर्ग शहरातील बेघर कुटूंबियांच्या वतीने पन्नालाल भाऊना भावपुर्ण श्रद्धांजली.

 
Top