अखेर प्रतिक्षा संपली, अवघ्या कांहीं वेळानंतर मतमोजणी प्रक्रियेस होणार सुरुवात, नळदुर्ग नगरपालिकेचा रणसंग्राम; राजकीय पारा शिगेला


नळदुर्ग ,दि.२१: शिवाजी नाईक 

नगरपालिका निवडणुकीच्या निकालाबाबत शहरात प्रचंड कुतूहल निर्माण झाले असून, वाढत्या थंडीच्या वातावरणातही राजकीय चर्चानी नळदुर्गचे वातावरण अक्षरशः तापले आहे. पालिकेवर सत्ता कुणाची येणार आणि नगराध्यक्ष कोण होणार?" चौकाचौकात, चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत एकच प्रश्न घुमतो आहे.

प्रचार व मतदान संपल्यानंतरही कार्यकर्त्यांच्या हालचाली, सोशल मीडियावरील पोस्ट, विजयाचे दावे आणि अंदाज यामुळे राजकीय रंगत कायम आहे. प्रत्येक गट 'आमचाच उमेदवार निवडून येणार'  गुलाल आमचाच,असा ठाम दावा करत असल्याने नेमका कल कोणाकडे आहे, हे ओळखणे राजकीय विश्लेषकांनाही अवघड ठरत आहे. ही निवडणूक केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित न राहता नळदुर्गच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची कसोटी मानली जात असून, त्यांच्या संघटनबळाची आणि रणनीतीची खरी परीक्षा येथे होत आहे. तर काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

नळदुर्ग येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासह २० नगरसेवकपदांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज रविवारी जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद मुलांच्या प्रशालेतील स्ट्रॉग रूम परिसरात सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

 नगराध्यक्षपदासह २० नगरसेवकांसाठी २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत १२ हजार ५२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजता सुरू होत आहे. पाच टेबलावर ही मतमोजणी होणार असून, प्रत्येक टेबलावर एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. नगरसेवकपदासाठी चार फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. नगराध्यक्षपदासाठीही पाच टेबलावर मतमोजणी होणार आहे.

१० वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी प्रक्रिया

येथील १० प्रभागांतून  २० नगरसेवक पदांसाठी व नगराध्यक्षपदासाठी वीस मतदान केंद्रांवर मतदान झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी सहा, तर वीस नगरसेवक पदांसाठी ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात  होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर तहसीलदार प्रमोद गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, अतिरिक्त सहायक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार घृष्णेश्वर स्वामी हे काम पाहत आहेत.

मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजता होत असुन मतमोजणी अहवाल ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने जाहीर करण्यासाठी दोन स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. मतमोजणी परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, त्याठिकाणी निवडणूक विभागाने दिलेल्या ओळखपत्र धारकांनाच प्रवेश मिळणार आहे.

नगरपालिकेच्या मतमोजणीसाठी पोलिस प्रशासन दक्ष  सर्वत्र करडी नजर

 निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी अवघ्या दोन तासांवर म्हणजे १० वाजता सुरू होणार आहे. पोलिस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने  दिला आहे.  विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढून पराभूत उमेदवार किंवा इतर समुदायांच्या भावना दुखावल्यास कारवाई केली जाईल. शासनाने विजयी मिरवणुकीवर निर्बंध घातले असून, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.


 
Top