नळदुर्गचा आठवडी बाजार उद्या गुरुवारी भरणार
नळदुर्ग नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी रविवार (दि. २१) डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशाला, माऊली नगर येथे होणार आहे. मतमोजणी मुळे होणारी गर्दी, त्यातच असणारा आठवडे बाजार , यावेळी प्रशासनावर ताण येऊ नये, मतमोजणी नंतर होणारा जल्लोष, विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून आनंद उत्सव साजरा करत असताना बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही अडथळा निर्माण होऊ शकतो व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही उद्भवू शकतो तसेच शेतकऱ्यांचा सण असलेला दर्शवेळा (येळवस) अमावस्या शुक्रवार (दि.१९) रोजी होणार असल्यामुळे या मोठ्या सणापूर्वी गुरुवारी (दि.१८) रोजी आठवडे बाजार भरवण्याचा निर्णय व्यापारी व प्रशासनाने एकमताने घेतला.
त्यामुळे गुरुवार (दि.१८) रोजी नळदुर्ग येथील आठवडे बाजार भरवण्यात येणार आहे. शेतकरी, व्यापारी व नागरिकांना याची माहिती व्हावी म्हणून मागील आठवडे बाजारा दिवशी नगरपालिका प्रशासनाने मुख्य चावडी चौकात वार्ता फलक लिहून व आठवडे बाजारात सर्वत्र दवंडी देऊन ही माहिती सांगण्यात आली आहे.