नळदुर्ग केंद्रावर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा शांततेत ; २१६ परिक्षार्थीनी दिली परिक्षा
नळदुर्ग ,दि.१३:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा नळदुर्ग शहरातील जि.प.कन्या प्रशाला केंद्रांवर शनिवारी शांततेत पार पडली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षणाची संधी देणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी उत्सुकता दिसून आली. परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे इयत्ता पाचवी वर्गातील असुन खासगी व जि.प. शाळेतील असे मिळुन एकुण २१६ विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली. धाराशिव जिल्ह्यातील ८० जागेसाठी ही परिक्षा घेण्यात आली.एकटया नळदुर्ग परिक्षा केंद्रावर तब्बल २१६ परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे. नळदुर्ग येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत शनिवार दि.१३ डिसेंबर रोजी दोन तास लेखी परीक्षा घेण्यात आली.
माध्यमिक शिक्षण विभागाने या परीक्षेचे नियोजन आखले होते. केंद्र प्रमुख व भरारी पथक महाजन तानाजी , निरीक्षक सुजाता कराड , तर केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक निजाम इनामदार यांनी काम पाहिले. सकाळी सव्वा अकरा वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रात पोहोचले होते. साडे अकरा ते दीड या वेळेत परीक्षा झाली.