हसू आणि आसू याचा सुरेख संगम म्हणजे धरित्री विद्यालयातील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

नळदुर्ग,दि.०१ जानेवारी : डॉ. दिपकजगदाळे 

ज्ञानदीप कलोपासक मंडळ, नळदुर्ग संचलित धरित्री विद्यालयात आज माजी विद्यार्थी स्नेहबंधन सोहळा साजरा करण्यात आला.सर्वप्रथम सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक यांना मानाचे तुरे म्हणून फेटे बांधण्यात आले.नंतर माजी विद्यार्थ्यांचे ढोल व ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण आर.बी. व आपलं घरचे व्यवस्थापक विलास वकील यांच्या हस्ते स्मरणिका व गुच्छ देऊन स्वागत केले.नेहमीप्रमाणे शाळेची घंटी झाली. माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत व प्रार्थना सादर केली. माजी विद्यार्थ्यांनी मार्चिंग केले व मान्यवरांना मानवंदना दिली.

 यानंतर शालेय परिसरात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व माजी शिक्षक यांनी वृक्षारोपण केले. माजी विद्यार्थ्यांनी आंबा,नारळ इत्यादी वृक्षांची रोपे आणली होती.वृक्षारोपणानंतर दहावीचा वर्ग भरवण्यात आला.सर्व विद्यार्थी 2005 मधील त्यांच्या दहावीच्या वर्गात बसले. त्यांच्या शिक्षकांनी त्यांचा तास घेतला. यामध्ये कविता व प्रार्थना सादर केल्या. यानंतर प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात झाली.सर्वप्रथम जेष्ठ विचारवंत कै.पन्नालाल भाऊ सुराणा यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.माजी विद्यार्थी प्रवीण टेकाळे,विकास डोंगरे ,गणेश जाधव व इंदुमती आरळे यांना देखील आदरांजली वाहण्यात आली.नंतर खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण आर.बी. व आपलं घरचे व्यवस्थापक वकील विलास यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत कुंडीतील रोपाला पाणी घातले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण रमेश,आपलं घरचे व्यवस्थापक विलास वकील, शाळेचे माजी मुख्याध्यापक सुनील पुजारी, सातलगावकर अण्णाप्पा, जगताप गोरख,पवार गुंडू, चवले संदीप, चिंचोले वैजिनाथ,सुहासिनी जाधव,शुभांगी कारंजे,शुभांगी कलवले, स्मिता फडणीस, माजी विद्यार्थिनी प्रतिनिधी रेखा मोरे व माजी विद्यार्थी प्रतिनिधी बाबासाहेब उपस्थित होते.

त्यानंतर विलास वकील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रस्तावनेमध्ये त्यांनी आपलं घर स्थापने मागील उद्देश, कै. पन्नालाल भाऊ सुराणा यांचे कार्य सांगून विद्यार्थ्यांना सहकार्याचे आवाहन केले.यानंतर माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी माजी विद्यार्थिनी शितल कोळी दहावीमध्ये मुलीत प्रथम व दत्ता पाटील मुलांमध्ये द्वितीय आल्याने या दोघांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. माजी विद्यार्थीनी शिवलीला पाटील व रेखा मोरे यांनी वर्षातून दोन वेळेस आपलं घर मध्ये आरोग्य शिबिर घेण्याचे आश्वासन दिले. तसेच रेखा मोरे हिने दरवर्षीप्रमाणे दहावीतील एका विद्यार्थ्याच्या खर्चाची जबाबदारी घेतली. इतर सर्व विद्यार्थ्यांनी देखील आपापल्या परीने आपलं घरमधील व शाळेतील विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.शाळेतील ज्येष्ठ माजी शिक्षक सातलगावकर सर यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील शिक्षक जगताप सरांनी आपलं घर या नावाची सार्थकता विद्यार्थ्यांना सांगितली. शाळेच्या माजी विद्यार्थी गुंडू पवार यांनी आपल्या मनोगतात आपल घरचे महत्त्व व पन्नालाल भाऊंना वाहलेल्या आदरांजलीचा खरा अर्थ सांगितला. शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री पुजारी सर यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या विनोदीशैली द्वारे विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. सुहासिनी जाधव मॅडम यांनी प्रत्येक माजी विद्यार्थी म्हणजे धरित्री विद्यालयाची एक शाखाच आहे असे सांगितले. त्यांच्या आयुष्यातील यशाची सुरुवात या शाळेतूनच झाल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच त्यांनी दहावी वर्गातून प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये व आपलं घर वसतीगृहातून प्रथम तीन क्रमांक घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी हजार रुपये बक्षीस जाहीर केले.याशिवाय आपलं घर मधील दहा विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आजच धनादेश देण्याचे जाहीर केले.अध्यक्षीय समारोपात शाळेचे मुख्याध्यापक यांनी माजी विद्यार्थांबरोबर घालवलेल्या काही आठवणी सांगितल्या. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व शाळेच्या विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका शहा संगीता यांनी देखील सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये माजी विद्यार्थी दिपक दरेकर,दत्ता पाटील, अमोल व्हनाळे,प्राची जगदाळे, शितल कोळी, शिवलीला पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले.उपस्थितांचे आभार कलवले मॅडम यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी विद्यार्थी अमोल गुरव यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण ,उपाध्यक्ष मा. भीमराव मोरे, सचिव  अॅड. सयाजी शिंदे,सहसचिव  वसंत रामदासी, कोषाध्यक्ष  मल्लिनाथ माळगे,सदस्य दत्तात्रय जोमदे, प्रा.नरसिंग माकणे,किरण पाटील, सुभाष दासकर, निताताई पाटील व अर्चनाताई डुकरे यांनी देखील माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
 
Top