आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शहापूर येथे प्रा. आ. उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन तर सभा मंडपाचे लोकार्पण,
नळदुर्ग,दि.१३ :
शहापूर, ता. तुळजापूर येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त श्री खंडोबा देवस्थान समोर रु. १० लक्ष निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपाचे लोकार्पण दि.१२ जानेवारी रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सभा मंडपामुळे भविष्यात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
तसेच गावातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात या उद्देशाने रु. ६० लक्ष निधीतून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन केले. या आरोग्य उपकेंद्रामुळे शहापूर व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होणार आहे.
यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. मातृशक्ती, राष्ट्रभक्ती आणि संस्कारांची प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बोलताना म्हणाले की, महायुती सरकारने तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी भव्य असा १८६५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला असून, त्यापैकी ५५५ कोटी ८० लाख रुपयांच्या चार प्रमुख पहिल्या टप्प्यातील कामांच्या निविदांना मान्यता देण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार असून भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासोबतच कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्प तसेच धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना पाणी, युवकांना रोजगाराच्या संधी आणि संपूर्ण जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नळदुर्ग व परिसराच्या विकासासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
महायुती सरकारच्या सक्षम नेतृत्वामुळे जिल्ह्यातील इतरही अनेक विकासकामे मार्गी लागली असून, विकासाचे हे चक्र अधिक गतीने पुढे जात आहे. अलीकडेच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेले ऐतिहासिक यश हे विकासाच्या राजकारणावर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाचे स्पष्ट प्रतीक आहे. याच विश्वासाच्या जोरावर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपाला तितकेच घवघवीत यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सरपंच उमाकांत गोरे, राजकुमार जाधव, सिद्धेश्वर कोरे, विलास राठोड, भिवाजी इंगोले, सचिन घोडके, युवराज पाटील, पद्माकर जेवळे, राजेंद्र तांदळे, श्रीमंत सुरवसे, बाळासाहेब वाघमारे, विठ्ठल घंटे, सचिन वाघोळे, नूरखान पठाण, लक्ष्मण क्षीरसागर सिध्देश्वर कोरे, विलास राठोड, युवराज पाटील, भिवा इंगोलो, प्रदीप काळे, पांडुरंग मोरे, संतोष काळे, अर्जुन मोरे, राजेंद्र जाधव, भरत मोरे आदीसह कार्यकर्ते, व ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.