श्री खंडोबाची पौष पोर्णिमा महायात्रे निमित्त मैलारपूर सज्ज;  यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

नळदुर्ग,दि.०२ जानेवारी 

नळदुर्ग शहराच्या उत्तरेस बोरी नदीच्या काठावर असलेल्या मैलारपूर  येथील श्री खंडोबाची पौष पोर्णिमा महायात्रा आज शुक्रवार दि.२ जानेवारी पासुन सुरू होत असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेस लक्षावधी भाविक हजेरी लावणार असल्याने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

श्री क्षेत्र मैलारपूर याठिकाणी अंघोळीसाठी बोरी नदीच्या कालव्यातूून पाणी सोडण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधण्यात आले आहेत.यात्रेसाठी मंदिर परिसरात विविध प्रासादिक भांडार,खेळणीची दुकाने, मिठाईची दुकाने, बच्चे कंपनीसाठी करमणुकीसाठी पाळणे, खेळणी आणि विविध स्टॉल्स थाटण्यात आली आहेत.

यात्रा शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी,तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस परिश्रम घेत आहेत. पोेलीस,राज्य राखीव दलाचे जवान, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. मंदिरात परिसरात सीसीटीव्ही कँमेरे बसवण्यात आले असून, भाविकांवर कॅमेराची नजर राहणार आहे.यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंदिर समिती, नळदुर्ग नगर परिषद,अणदूर आणि नळदुर्ग यात्रा कमिटी, दोन्ही गावचे मानकरी, पुजारी मंडळ,ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

नगराध्यक्ष बसवराज धरणे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली. यावेळी पालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन, आरोग्य विभाग, विद्युत महामंडळ यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यात्रा काळात मूलभूत सुविधांसह पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा देण्यासह यात्रा शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. *तसेच यात्रा काळात दोन ते चार जानेवारीच्या दरम्यान बहाय वळण (बायपास) मार्ग जड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे अवजड वाहनधारकांना जुन्या म्हणजे नळदुर्ग मार्गे प्रवास करावा लागणार आहे
 
Top