नळदुर्ग नगरपालिकेचे अंदाजपत्रक रद्द करुन
कायद्यानुसार योग्य प्रक्रिया राबवून नव्याने अंदाजपत्रक सादर करण्याची काँग्रेस गटाची मुख्याधिका-याकडे मागणी 

नळदुर्ग, दि. २६ :

नळदुर्ग नगरपालिकेच्या सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप नोंदवत सदरील अंदाजपत्रक स्थायी समितीत  न मांडता ते थेट सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप करुन योग्य त्या कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची मागणी  निवेदनाद्वारे न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे .

काँग्रेस गटाच्या नगरसेवकांनी  निवेदनात नमूद केले आहे की, २०२६-२७ या वर्षाचे अंदाजपत्रक कायद्यानुसार अपेक्षित प्रक्रियेप्रमाणे प्रथम स्थायी
समितीसमोर मांडणे आवश्यक होते. मात्र, ही प्रक्रिया न पाळता अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले, हे कायदेशीर तरतुदी व नियमानुसार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आर्थिक विषयांवर स्थायी समितीची पूर्व तपासणी अनिवार्य असताना ती टाळण्यात आल्यामुळे मंजुरी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य मंजूर करण्यात आलेले अंदाजपत्रक रद्द करावे व
कायद्यानुसार योग्य प्रक्रिया राबवून नव्याने अंदाजपत्रक सादर करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, आमचे म्हणणे न ऐकता अंदाजपत्रक बहुमताने मंजूर केल्यास त्या मंजुरीस आमचा विरोध असल्याची लेखी नोंद प्रोसेडिंगमध्ये घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर काँग्रेस पक्षाचे गटनेते मारुती खारवे, उपगटनेते आकाश कुलकर्णी, नगरसेवक इमाम शेख, सुधीर पोतदार नगरसेविका अपर्णा बेडगे, कमलबाई गायकवाड, मदिना बागवान, जुलेखांबेगम इनामदार , मुन्नाबी कुरेशी यांच्या सह्या आहेत.
 
Top