धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील तर उपाध्यक्षपदी उषाताई गायकवाड यांची निवड
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीच्या सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील आणि उपाध्यक्षपदी सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दि.१३ मार्च रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत ५५ पैकी तब्बल ४५ मते महायुतीला मिळाली. या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
सौ. अर्चनाताई पाटील यांच्या रुपाने इतिहासात प्रथमच धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला मिळाले आहे. ही बाब ऐतिहासिक, अभिमानास्पद आहे. हा विजय महायुतीच्या भक्कम एकजुटीचा, विकासाभिमुख विचारसरणीचा आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा सौ. अर्चना पाटील व उपाध्यक्षा सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होईल, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे निर्णय अधिक वेगाने पुढे जातील, असा विश्वास आहे.
महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अधिक बळ मिळत असून, धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा आणि नवे बळ मिळेल, याची खात्री त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी खा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले तसेच, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अँड नितीन काळे, यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.