कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि रुग्णसेवा ही मूल्ये जपल्यास आपण नक्कीच यशस्वी व्हाल....प्रा. डॉ. महेश मोटे
माधवराव पाटील फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्नेहपूर्ण निरोप समारंभ संपन्न...
मुरूम, ता. उमरगा, दि. १८
फार्मसी हे क्षेत्र आरोग्याशी संबंधित असून अत्यंत जबाबदारीचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून न थांबता, सतत नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडून राहावे. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि रुग्णसेवा ही मूल्ये जपल्यास आपण नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले.
मुरूम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या सांस्कृतिक सभागृहात आकर्षक सजावट आणि फलक लावून शनिवारी (ता. १८) रोजी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे होते. यावेळी प्रा. डॉ. महेश मोटे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कमलाकर मोटे, प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. रफिक शेख, प्रा. वैष्णवी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील शिक्षक, शिस्त आणि मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना उजाळा दिला. प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच उत्तम माणूस व्हा, असा संदेश दिला. कठोर परिश्रमच यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत डॉ. रवींद्र आळंगे यांनी व्यक्त केले.
अध्यक्ष समारोपप्रसंगी डॉ. होगाडे म्हणाले की, उद्या तुम्ही मोठे संशोधक व्हाल, यशस्वी उद्योजक व्हाल किंवा नावाजलेले फार्मसिस्ट व्हाल, तेव्हा तुमच्या यशात या महाविद्यालयाचा सहभाग असेल याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटेल. महाविद्यालय तुमच्याकरिता नेहमी उघडे असेल. शेवटी इतकेच म्हणेन की, तुमची जिद्द आणि कष्टाच्या जोरावर तुम्ही यशाचे शिखर गाठावे. तुमच्या भावी आयुष्यासाठी, करिअरसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. प्रा. हर्षद बदोले, डॉ. राजकुमार देवशेट्टे, मल्लिकार्जुन स्वामी, किशोर कारभारी, बालाजी शेळके, प्रतिभा शेळके आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रियंका काजळे यांनी केले. सूत्रसंचालन हुमा लोणी तर आभार प्रा. विनंती बसवंतबागडे यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये निरोप समारंभ प्रसंगी डॉ. महेश मोटे बोलताना महेश्वर होगाडे, रवींद्र आळंगे, कमलाकर मोटे, योगेश पाटील व अन्य.