नळदुर्ग नगरपरिषदेत “हरित धाराशिव २०२५” अंतर्गत वृक्षारोपणात गैरप्रकार, संबंधिताना निलंबित करण्याची नगरविकास मंत्र्याकडे मागणी
नळदुर्ग,दि.१४:
नळदुर्ग नगरपरिषदेत “हरित धाराशिव 2025” अंतर्गत वृक्षारोपण करताना गैरप्रकार करण्यात आल्याचे आरोप करत याप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे.
“हरित धाराशिव 2025” अंतर्गत नळदुर्ग शहरात करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कामात आर्थिक गैरव्यवहार, निविदा प्रक्रियेत अनियमितता, बनावट मजूर नोंदी, मोज मापातील तफावत तसेच शासन नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक खारवे मारुती सुदाम, सुधीर बाबुराव पोतदार व आकाश दिलीपराव कुलकर्णी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथ नगरविकास मंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
सदर तक्रारीमध्ये म्हटले आहे की, तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापालसह संबंधित नर्सरी ठेकेदार यांच्यावर संगनमताने शासन निधीचा अपव्यय केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, हरित धाराशिव अभियानांतर्गत सुमारे 30 हजार वृक्ष लागवडीचे काम करण्यात आले असल्याचे दाखवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कामामध्ये अनेक अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. निविदा प्रक्रिया नियमबाह्य राबविणे, एका व्यक्तीस विविध प्रकारची कामे देणे, वाहतूक व मजूर खर्च फुगवून दाखवणे, शासकीय रोपे मोफत उपलब्ध असताना खाजगी खर्च दाखवणे, तसेच बनावट मजूर नोंदीद्वारे आर्थिक अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच, काळी माती वाहतूक, ट्रॅक्टर फेऱ्या, जेसीबी, मजूर पुरवठा यांसंबंधीच्या बिलांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहीती अधिकारा अंतर्गत खोटी माहीती दिली गेली आहे. तरी प्रत्यक्ष पाहणी व पंचनाम्याद्वारे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने विभागीय आयुक्ता मार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि नगरपालिकेचे झालेले आर्थिक नुकसान दोषींकडून वसूल करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.