नळदुर्ग येथे महसुलचे महाराजस्व अभियान; नागरिकांना मात्र मनस्ताप ?
नळदुर्ग,दि.१६ :
नळदुर्ग येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात नळदुर्ग मंडळातील विविध गावातील नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी प्रशासनातील विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.
अभियानामध्ये तुळजापुरचे तहसीलदार अरविंद बोळंगे, अप्पर तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी अभियानाची माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी नळदुर्गसह परिसरातील लोकप्रतिनिधी राजकीय पदाधिकारी यांची उपस्थिती होती. शिबिरा दरम्यान शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, आधार अपडेट, आयुष्यमान कार्ड वाटप व अर्ज स्वीकारण्यात आले.
शिबिर यशस्वीतेसाठी महसूलचे कर्मचारी तलाठी विश्वास वायचळ, रफिक फुलारी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले.
महाराजस्व अभियान की दिखावा ?
सामान्य नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचवून नागरिकांच्या अडीअडचणी दूर करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवत असताना महसुल प्रशासन कमी पडल्याचे चित्र नळदुर्ग येथे पहावयास मिळाले. महाराजस्व शिबिरासाठीचे ठिकाण गावातील जुन्या भागापासून बाहेर दूरवर ठेवल्यामुळे नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागल्याचे दिसून आले.
तर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या शिबीराकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. तसेच शिबिराचे ठिकाण ठरवताना स्थानिक प्रशासन असलेल्या नगरपालिका व लोक प्रतिनिधींशी कसलीही चर्चा वा विचारविनिमय करण्यात आला नाही. त्यातच मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून शिबिरात कोणते व किती प्रस्ताव/अर्ज आले, कोणते अर्ज जाग्यावर निकाली काढण्यात आले, कोणते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ही माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे सकाळी दहा वाजता शिबिर सुरू करण्यात येणार होते. मात्र शिबिर प्रत्यक्षात साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान सुरू करण्यात आले. त्यानंतरही राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे सत्कार सोहळा, भाषणं यामुळे शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले नागरिक ताटकळल्याचे दिसून आले. यामुळे शिबिराच्या यशस्वीतेवर नागरिकातुन प्रश्न उपस्थित केले जात आहे.