ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतराच्या घोषणेनंतर नळदुर्ग शहरात ठाकरे शिवसैनिकांचे ‘जोडे मारो’ आंदोलन
नळदुर्ग, दि. २२ जून :
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडून शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर नळदुर्गात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तुळजापूर तालुका शिवसेना (उबाठा)च्या वतीने सोमवारी संविधान चौकात खासदार निंबाळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले.
शहरातील लोकमान्य वाचनालय परिसरातून खासदार निंबाळकर यांची प्रतिमा घेऊन शिवसैनिकांनी हलगीच्या गजरात व जोरदार घोषणाबाजी करत शहरातून मोर्चा काढला. बसस्थानकासमोरील संविधान चौकात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रतिमेस जोडे मारून निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान पक्षांतराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी, जिल्हा परिषद सदस्य तथा उपजिल्हाप्रमुख डॉ. जितेंद्र कानडे, माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक प्रदीप जोशी, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके, शहरप्रमुख संतोष पुदाले, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, राजेंद्र जाधव, प्रसाद भोसले, दत्त भोसले, शाम कनकधर, सोमनाथ म्हेत्रे, बालाजी गायकवाड, दगडू शिंदे, रघुनाथ कोकरे, सुनील पाटील, सुरज साळुंखे, भीम कोळी, चंद्र सगरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरप्रमुख संतोष पुदाले यांनी केले. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी पक्षांतराच्या निर्णयावर टीका करत आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. जितेंद्र कानडे यांनी पक्षाशी निष्ठा राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तर अजय दासरी यांनी लोकसभेत मतदारांनी दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून देत मतदारांच्या भावनांचा आदर करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांनीही खासदार निंबाळकर यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत जोरदार टिकास्त्र सोडले.
आदोलनादरम्यान अनेक वक्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील निष्ठा पुन्हा व्यक्त केली आणि पक्षांतराचा निर्णय शिवसैनिकांना मान्य नसल्याचे स्पष्ट केले.