नळदुर्ग आठवडी बाजारावर बंजारा समाज बहिष्कार घालणार; रवी महाराज राठोड यांची माहिती
नळदुर्ग, दि. २३ जुन :
घाणीचे साम्राज्य, उघड्या गटारी आणि अपुऱ्या सुविधांमुळे नळदुर्ग शहरातील आठवडी बाजाराविरोधात नाराजी वाढत असून, या बाजारावर बंजारा समाज बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समाजाचे प्रतिनिधी रवी महाराज राठोड यांनी दिली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शहरातील नागरिकासह व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नळदुर्ग शहराचा विस्तार गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणावर झपाट्याने झाला आहे. पूर्व-पश्चिम दिशेने वाढलेल्या शहराच्या तुलनेत आठवडी बाजार मात्र अद्यापही पूर्वेकडील एका कोपऱ्यात जुन्या जागेवरच भरत आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी त्या काळातील शहररचनेनुसार निश्चित करण्यात आलेली ही जागा आजच्या वाढत्या लोकसंख्येला पूरक राहिलेली नाही, असा नागरिकांचा सुर आहे.
बाजार भरत असलेल्या परिसरात स्वच्छतेचा अभाव, उघड्या गटारी, अरुंद रस्ते , पार्किंगची
गैरसोय यामुळे ग्राहकांसह, शेतकरी ,विक्रेत्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच जलवाहिनी टाकण्याच्या खोदकामामुळे विशेषतः पावसाळ्यात चिखल, होवुन ,पाणी आणि दुर्गंधीमुळे बाजार परिसरातील परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जवळपास ५ कि.मी पेक्षा अधिक अंतरापर्यंत पसरलेल्या नळदुर्ग शहरातील साखर कारखाना ,वसंतनगर, दुर्गानगर, इंदिरानगर, ठाकरेनगर, व्यंकटेशनगर, जगतापनगर आणि व्यासनगर, रामलीला नगर आदी विकसित झालेल्या भागांतील नागरिक या बाजाराकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गैरसोयीच्या स्थानामुळे , मुलभूत सुविधा नसल्याने बहुतांश नागरिक खरेदीसाठी शहराबाहेरील जवळच्या आठवडी बाजाराचा पर्याय स्वीकारताना दिसून येत आहे.
काळानुरूप बदल स्वीकारत काही व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय इतर भागात स्थलांतरित केले आहेत. आठवडी बाजारातील ग्राहक संख्या घटत चालल्याने स्थानिक व्यापारावरही परिणाम जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
नळदुर्गची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात कष्टकरी बंजारा समाजाच्या खरेदी-विक्रीवर अवलंबून असल्याचे मानले जाते. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आठवडी बाजाराच्या दिवशी नळदुर्गमध्ये येऊन आवश्यक वस्तूंची खरेदी करतात. प्रशासनाने तातडीने सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावे, सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने हा आठवडी बाजार मध्यवर्ती ठिकाणी भरवावे, जेणे करून बाहेर गावाहुन बाजाराकरिता येणा-याना सोयीचा ठरेल.या मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा भाग म्हणून बंजारा समाजाचा बहिष्कार घालण्याचा इशारा रवि महाराज राठोड यांनी दिला आहे.
बाजाराचे स्थलांतर शहराच्या मध्यवर्ती व प्रशस्त ठिकाणी करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. तसेच स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
बंजारा समाजाच्या बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे आता व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.