धाराशिव जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची घोषणा; तुळजापूरसह सात तालुक्यांवर नव्या नेतृत्वाची जबाबदारी
धाराशिव, दि. २७ :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने राज्यातील विविध जिल्ह्यांतील अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सात अध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
नव्या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीला गती मिळणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार धाराशिव अध्यक्षपदी विनोद जीवनराव वीर, धाराशिव शहर तालुका अध्यक्षपदी धनंजय रामभाऊ राजवत, वाशी तालुका अध्यक्षपदी अमर मुरलीधर तागंडे, भूम बतालुका अध्यक्षपदी ॲड. सिराज हुसेन मोगल, लोहारा तालुका अध्यक्षपदी दयानंद सुग्रीव पाटील, तुळजापूर तालुका अध्यक्षपदी ॲड. अरविंद बेडगे, तर लोहारा शहर अध्यक्षपदी रऊफ बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, बूथस्तरावरील कार्यकर्त्यांचे जाळे वाढविणे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी बळकट करण्याची जबाबदारी असणार आहे.
नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक प्रभावीपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.