नळदुर्गच्या पाणीपुरवठा योजनेची ‘संथगती एक्सप्रेस’; नागरिकांचा संयम ‘आऊट ऑफ कव्हरेज’!
नळदुर्ग, दि. २८ जून :
नळदुर्ग शहरात सध्या दोनच गोष्टींचा बोलबाला आहे.एक म्हणजे पावसाळा आणि दुसरी म्हणजे पाणीपुरवठा योजनेची ‘धिम्या गतीने धावणारी’ एक्सप्रेस! फरक एवढाच की पाऊस कधी तरी वेळ पाळतो, पण ही योजना अजूनही ‘लगेच सुरू होणार’ या वचनावरच अडकली आहे.
नागरिकांना आता गंभीर शंका यायला लागली आहे. ही पाणीपुरवठा योजना आहे की संयम वाढवण्याचा सरकारी प्रयोग? कारण शहरात जिथे तिथे खणलेले खड्डे पाहिले की वाटतं, आपण विकासकामात नसून ‘खड्डे संवर्धन स्पर्धेत’ सहभागी झालो आहोत. काही ठिकाणी खड्डे खणून ते दिवसन्दिवस तसेच ठेवले जातात. जणू ते शहराच्या सौंदर्यवर्धनाचा भाग आहेत.
मागील आठवड्यात बसस्थानकाजवळ एका खड्ड्यात मुलगी पडून जखमी झाल्यानंतर प्रशासनाला आठवलं की खड्डे हे फक्त सजावटीसाठी नसतात, ते धोकादायकही असतात! पावसाळ्यात तर या खड्ड्यांनी चिखलाचा ‘लाईव्ह शो’ केल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांना रोज ‘रिस्क घेऊन घराबाहेर पडण्याचा गेम’ खेळावा लागतो.
दरम्यान, दादांच्या प्रयत्नांतून तब्बल ४६ कोटींची योजना मंजूर झाली, तेव्हा नळदुर्गकरांनी आनंदाने जल्लोष केला होता."आता रोज पाणी येणार!" पण सध्याची परिस्थिती पाहता हा आनंद ‘सीरियलच्या पुढच्या भागासारखा’ लांबत चालला आहे.
हे काम करणाऱ्या सुजाता कन्स्ट्रक्शन कंपनीची गती पाहता ‘काम चालू आहे’ हा फलक लावण्यापेक्षा ‘काम सुरू करण्याची तयारी सुरू आहे’ असा फलक जास्त योग्य वाटतोय! त्यातच नगरपालिकेने दिलेल्या वारंवार मुदतवाढीमुळे ठेकेदाराचे ‘लाड पुरवले’ जात असल्याची चर्चा रंगली आहे.
या योजनेचा सर्वात भन्नाट भाग म्हणजे काम चालू आहे, पण माहिती ‘मिसिंग’! कोणती पाइपलाइन टाकली जातेय, तिचा आकार काय, दर्जा कसा हे जाणून घेण्यासाठी नागरिकांनी ‘CID’ मध्ये भरती व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे. कारण शहरात एकही माहिती फलक नाही!
चावडी चौक, किल्ला गेट, बसस्थानक यांसारख्या ठिकाणी माहिती फलक लावणं बंधनकारक असताना ठेकेदाराने त्याकडे ‘नो कमेंट’ धोरण स्वीकारल्याचं दिसतंय. त्यामुळे ‘पाणी कधी येणार?’ या प्रश्नाचं उत्तर अजूनही ‘लवकरच’ या जादुई शब्दातच अडकलेलं आहे.
नळदुर्गकरांनी आधीच १०-१२ दिवसांनी पाणी येण्याची ‘कला’ आत्मसात केली आहे. आता रोज पाणी मिळेल, अशी आशा होती; पण सध्याच्या गतीने ‘दररोज पाणी’ हा शब्दप्रयोग सध्या तरी फक्त स्वप्नातच दिसतोय.
विशेष म्हणजे ही योजना पुढील ३० वर्षांसाठी असल्याने कामाचा दर्जा उत्तम असणं गरजेचं आहे. कारण आजची छोटी चूक उद्या मोठं डोकेदुखी ठरू शकते आणि मग पुन्हा ‘खड्डे आणि चर्चा’ हा कार्यक्रम सुरूच!
नागरिकांची मागणी अगदी सोपी आहे ,काम लवकर पूर्ण करा, दर्जेदार करा आणि माहिती पारदर्शक ठेवा. अन्यथा ‘खड्डे खोदण्याच्या कलेत पारंगत’ असलेल्या ठेकेदाराला वास्तवाची जाणीव करून देण्याची वेळ येईल.
आता पाहायचं एवढंच,प्रशासन जागं होतं की नागरिकांचा संयम ‘नेटवर्क आउट’ होतो!