नळदुर्ग : गटारीवर भरतोय आठवडी बाजार; नागरिक, शेतकरी विक्रेत्यासह महिलांची कुचंबणा; स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी  प्रश्न ऐरणीवर

नळदुर्ग,दि.२२ जुन :

 नळदुर्ग शहरातील  अरुंद रस्त्यावर दाटीवाटीने रविवारी रोजी भरणारा आठवडी बाजार हे उघड्या गटारीवर भरत आहे . शेतकरी, महिलासह भाजीपाला विक्रेत्यांना व नागरिकांना घाणीच्या व दुर्गंधीच्या विळख्यात नाईलाजाने खरेदी विक्री करावी लागत आहे.त्याचबरोबर महिलांना नैसर्गिक विधी उरकण्यासाठी , पिण्याचे पाणीसह इतर  मोठ्या गैरसोयीना सामोरे जावे लागत असल्याने स्थानिक  समाज माध्यमातून या  "बाजार" तील व्यथेबद्दल संतापाची लाट पसरली आहे.
शहरातील गटार नाल्यांच्या कडेला आणि अरुंद रस्त्यांवर हा बाजार भरत असल्याने  गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्गंधीयुक्त वातावरणात व्यापाऱ्यांसह ग्राहकांना खरेदी-विक्री करावी लागत आहे.
सतीश पुदाले, अध्यक्ष  व्यापारी मंडळ, नळदुर्ग 
अस्वच्छतेमुळे  आणि आठवडी बाजारातील गैरसोयीमने शहरातील ६० टक्के नागरिक इतरत्र ठिकाणी बाजाराला जात आहेत.त्यामुळे नळदुर्गचा आठवडी बाजार मोडकळीस येत आहे. किमान बाजार भरण्याच्या दिवशी चारचाकी वाहनास बंदी घालुन पर्यायी मार्गाने वाहने वळविणे गरजेचे आहे.

याप्रकरणी आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगरपालिका प्रशासनास वारंवार निवेदने देऊन बाजारातील गैरसोयी दुर करण्याबाबत मागणी केली आहे.सदरील बाजार शहरातील पोलिस ठाणे ते भवानी चौक या मार्गावर भरविल्यास योग्य राहील,असे सतीश पुदाले यांनी बोलताना सांगितले. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने
न.प.प्रशासन , व्यापारी बांधव व नागरिक यांची बैठक घेवुन याविषयी मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली.

प्रमोद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते, नळदुर्ग 
 अस्वच्छ व गलिच्छ जागेत आठवडी बाजार वर्षानुवर्षे भरवला जातोय,गटाराच्या बाजूला व्यापारी भाजी-पाला विकत आहेत,पालिकेकडून कर वसुली केली जाते. पण सुविधा मात्र नाहीत.
 
 पालिकेने स्वच्छतागृह,पिण्याचे पाणी,स्वच्छता आदी सुविधा दिल्या पाहिजे,ज्या ठिकाणापासून बाजार भरवला जातो,तिथे ऐतिहासिक किल्ला आहे,येणाऱ्या पर्यटकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे,त्यामुळे आठवडी बाजाराबाबत पालिकेने योग्य तो विचार विनिमय करून आठवडी बाजाराबद्दल निर्णय घ्यावा.

गणेश मोरडे, अध्यक्ष ,सकल हिंदू समाज नळदुर्ग 
 आठवडी बाजारात खरेदी व विक्रीसाठी  शहरासह ग्रामीण भागातील येणा-या महिल शेतकरी , महिला विक्रेत्यांना स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होत आहे. महिला भगिनींची  गैरसोय दुर करण्यासाठी नळदुर्ग नगरपालिकेने  तात्काळ महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छतागृहाची  सोय करण्याची मागणी केली आहे.

एकीकडे विकासाच्या घोषणा आणि दुसरीकडे मूलभूत सुविधांचा अभाव, अशी परिस्थिती नळदुर्गच्या आठवडी बाजारात पाहायला मिळत असून आता तरी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 
Top