नळदुर्गच्या प्रलंबित विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे
शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांचे निवेदन; पर्यटन, आरोग्य व नागरी सुविधांच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
नळदुर्ग, दि. २१ जून :
ऐतिहासिक व तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या नळदुर्ग शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री Eknath Shinde यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाच्या मागण्या तातडीने मंजूर करून संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नळदुर्ग शहरात अनेक वर्षांपासून बंद असलेले शासकीय विश्रामगृह तातडीने सुरू करण्यात यावे. तसेच अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले असले तरी ते पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याची योग्य देखभाल, दुरुस्ती व पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी किल्ला बी.ओ.टी. तत्त्वावर देण्याचा प्रस्तावही निवेदनात मांडण्यात आला आहे. याशिवाय नव्याने सुरू झालेल्या उपजिल्हा रुग्णालयात अद्यापही अनेक आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याचे सांगत ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महसुली दृष्ट्या मोठे शहर असलेल्या नळदुर्ग येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शहरातील मालमत्ता धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी सी.टी. सर्व्हे तातडीने करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नगरपालिकेमार्फत मोफत नागरी रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच नगररचनाकारांनी मंजूर केलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मंजुरी देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, नळदुर्ग येथील वसंतनगर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र अधिकृत स्मशानभूमीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून गट क्रमांक २३६/७ मधील सुमारे एक एकर जागेचा स्मशानभूमी म्हणून वापर होत असल्याचे नमूद करून ती जागा अधिकृतपणे स्मशानभूमी म्हणून मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नळदुर्ग शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या सर्व मागण्यांची दखल घेऊन प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावावेत, अशी अपेक्षा ज्ञानेश्वर घोडके यांनी व्यक्त केली आहे. शहराच्या पर्यटन, आरोग्य, महसूल व नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविल्यास नळदुर्गच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.