बालाजी अमाईन्सकडून नळदुर्ग जि.प. प्रशालेला २० बेंच-डेस्कचे वाटप
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांना बळ; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
नळदुर्ग, दि. २१ जून :
शिक्षण क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व जपत विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बालाजी अमाईन्स व बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या वतीने नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशालेला २० बेंच-डेस्कचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
सोलापूर येथे शनिवारी (दि. २० जून) आयोजित विशेष कार्यक्रमात बालाजी अमाईन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी नळदुर्ग जिल्हा परिषद प्रशालेला २० बेंच-डेस्क प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक निजामोद्दीन इनामदार, सहशिक्षक संजय जाधव, शिपाई युसुफ शेख तसेच विद्यार्थी उपस्थित होते. नव्याने मिळालेल्या बेंच-डेस्कमुळे विद्यार्थ्यांना अधिक आरामदायी वातावरणात शिक्षण घेता येणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अनिल विपत यांनी कंपनीच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देताना सोलापूर जिल्ह्यातील २० आणि धाराशिव जिल्ह्यातील ८ शाळांना शालेय उपयोगी साहित्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित शाळांचे स्वागत करण्यात आले.
तसेच दत्तप्रसाद सांजेकर व अमोल गुंड यांनी कंपनीकडून दरवर्षी गरजू शाळांना विविध प्रकारची मदत केली जात असल्याचे नमूद केले. यंदाच्या साहित्य वाटपामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ७ शाळांना स्मार्ट टीव्ही, १० शाळांना संगणक संच, एका शाळेला इंटरॅक्टिव्ह बोर्ड तसेच ११ शाळांना तब्बल २२५ बेंचचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
बालाजी अमाईन्स कंपनीच्या या शैक्षणिक मदतीबद्दल लाभार्थी शाळांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत कंपनीचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह मूलभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.