तुळजापुरात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी; आनंद रोचकरी यांची निष्ठा ठळक


नळदुर्ग, दि. २१ जून :

धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनार्थ तुळजापूर शहरात मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख चौकात ,सार्वजनिक ठिकाणी झळकलेल्या या पोस्टर्समुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.


या पोस्टर मोहिमेच्या माध्यमातून आनंद रोचकरी यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरील आपली निष्ठा आणि विश्वास जाहीरपणे व्यक्त केला आहे. " आम्ही खंबीरपणे आपल्या सोबत आहोत" अशा आशयाचे संदेश असलेले फ्लेक्स बोर्ड नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तुळजापूरच्या राजकारणात विविध घडामोडींना वेग आला आहे. संभाव्य राजकीय समीकरणे, पक्षांतराच्या चर्चा आणि आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्याप्रती असलेली निष्ठा वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आनंद रोचकरी यांनी पुढाकार घेत ही पोस्टर मोहीम राबविल्याचे बोलले जात आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, ही पोस्टरबाजी केवळ एका कार्यकर्त्याच्या भावना व्यक्त करणारी नसून तुळजापूर परिसरातील अनेक समर्थकांच्या मनातील भावना प्रतिबिंबित करणारी आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेली विकासकामे, जनतेशी असलेला थेट संवाद आणि मतदारसंघातील सक्रिय उपस्थिती यामुळे त्यांच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.


 
Top