राष्ट्रवादीला नळदुर्ग शहरात धक्का ; युवक शहराध्यक्ष प्रमोद कुलकर्णींची शिवसेनेत उडी; माजी आमदार चौगुले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

नळदुर्ग, दि. २१ जून :

नळदुर्ग शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक शहराध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी  शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केले आहे.
 शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि धाराशिव जिल्हा उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी गौस कुरेशी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले.

नळदुर्ग शहरातील युवकांमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या प्रमोद कुलकर्णी यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीला धक्का बसल्याची चर्चा  रंगू लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे कुलकर्णी आता शिवसेनेच्या माध्यमातून नवी राजकीय वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थी राजकारणातून सुरू झालेला प्रवास
प्रमोद कुलकर्णी यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीची सुरुवात महाविद्यालयीन जीवनात भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून केली. युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी शहरात स्वतंत्र ओळख निर्माण केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर २००९ पासून त्यांनी मनसेमध्ये शहर सरचिटणीस म्हणून तब्बल सोळा वर्षे सक्रियपणे काम केले.

२०१६ चा अपवाद वगळता त्यांनी मनसेशी निष्ठा राखली. त्या काळात त्यांनी भाजपच्या चिन्हावर स्थानिक निवडणूक लढविली होती. मात्र, मनसेतील अंतर्गत वाद आणि पदासंदर्भातील अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला.


२०२५ मधील नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी मिळाली. शहरातील मूलभूत सुविधा, नागरी प्रश्न आणि विकासकामांबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे कुलकर्णी यांना स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. निवडणुकीत विजय मिळाला नसला तरी त्यांनी घेतलेली निर्णायक मतसंख्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली होती.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी त्यांची निवड तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा शिवसेनेत प्रवेश हा केवळ पक्षांतर नसून नळदुर्गच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवणारा निर्णय मानला जात आहे.


प्रमोद कुलकर्णी यांनी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, नागरिक सुविधा, शासकीय कार्यालयांतील समस्या अशा विविध विषयांवर वेळोवेळी आंदोलन केले. 


काही दिवसांपूर्वी त्यांनी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत त्यांनी अधिकृतरित्या शिवबंधन बांधले.
नळदुर्गात शिवसेनेची नव्या दमाची बांधणी
यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांनी सांगितले की, “प्रमोद कुलकर्णी, गौस कुरेशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नळदुर्ग शहरात पक्षाची नव्याने कार्यकारिणी गठित करण्यात येणार असून त्यासंदर्भातील माहिती पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आली आहे. लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात येईल.”


एकंदरीत, राष्ट्रवादीच्या गोटाला धक्का देत शिवसेनेने नळदुर्गात आपली संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
 
Top