माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार; जुन्या मैत्रीला उजाळा
नळदुर्ग दि. २३ जून:
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि खंडोबा देवस्थानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
निवडणुकीतील दणदणीत विजय मिळवल्यानंतर बसवराज पाटील यांनी आपल्या ज्येष्ठ सहकारी व मार्गदर्शक मानल्या जाणाऱ्या मधुकरराव चव्हाण यांची अणदुर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. अनेक वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक संबंधांना उजाळा देणारी ही भेट विशेष चर्चेचा विषय ठरली.
सत्कार समारंभात बसवराज पाटील यांना पुष्पहार घालून तसेच खंडोबा देवस्थानाच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मधुकरराव चव्हाण यांनी पाटील यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मतदारसंघातील विकासकामांना गती देऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बसवराज पाटील यांनीही मधुकरराव चव्हाण यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ भविष्यातही घेत राहणार असल्याचे सांगितले. राजकारणातील बदलत्या समीकरणांमध्येही जपलेली मैत्री आणि परस्पर स्नेह हेच या भेटीचे वैशिष्ट्य असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य रणवीर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य धनराज मुुळे, अप्पू धमुरे , मनोज मुुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या सत्कार समारंभाने त्या आनंदात आणखी भर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळातही या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे.