मोहरमनिमित्त नळदुर्गमध्ये बंधुभावाचे दर्शन; दिवसभर सरबत-ज्यूसचे वाटप
नळदुर्ग,दि.२७:
योमे आशूरा (मोहरम) निमित्त शुक्रवारी (दि. २६) नळदुर्ग शहरात धार्मिक उत्साहात विविध पंजे-सवारींच्या मिरवणुका काढण्यात आल्या. हिंदू-मुस्लिम बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरात बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. मिरवणुकीदरम्यान भाविकांसाठी विविध ठिकाणी दिवसभर सरबत मोफत वाटप करण्यात आले.
शहरात बारा इमाम, इमाम कासीम, अब्बास अली, हुंडे नालसाब, नाले हैदर, अली असगर, मौला अली व हुसेन बादशाह अशा एकूण नऊ पंज्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मोहरमच्या दहाव्या दिवशी दुपारी ३ वाजता ऐतिहासिक किल्ल्यातील सरकारी पंजे बडे बारे इमाम व छोटे बारे इमाम यांना विधीपूर्वक बाहेर आणण्यात आले. त्यानंतर इमाम कासीम, अब्बास अली, नाले हैदर, हुंडे नालसाब, अली असगर आणि हुसेन बादशाह यांचे पंजेही जागेवरून उठविण्यात आले.
सायंकाळी सर्व पंजे एकत्र आल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेण्याचा पारंपरिक सोहळा पार पडला. हा भावनिक क्षण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणूक शहरातुन मुख्य बाजपेठ मार्गे काढत नानीमा दर्ग्याच्या पाठीमागील कर्बला मैदानात पोहोचली. तेथे धार्मिक विधीनुसार पंज्यांचे विसर्जन करण्यात आले.
मिरवणुकीदरम्यान नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
दहा दिवस चाललेल्या मोहरम उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मैनोद्दीन शेख, नुरोद्दीन शेख, खमरोद्दीन शेख, जहीर सय्यद, रहेमान कुरेशी, कौसर शेख, सलाउद्दीन शेख, अजहर शेख, इसाक गाताडे, निजाम शेख, अबुबकर शेख, तौफिक कुरेशी, मुजम्मिल कुरेशी, गौस कुरेशी, वसीम कुरेशी, जब्बार कुरेशी, राजू शहा, अरफात सय्यद, शमशोद्दीन शेख, सलीम शेख, मैनोद्दीन मासुलदार, अन्वर शेख, इस्माईल शहा, सुलतान शेख, महेबूब सय्यद, इकबाल शाह, फारुक शहा व युसुफ शेख यांनी परिश्रम घेतले.
मोहरमनिमित्त शहरात विविध ठिकाणी दिवसभर सरबत व ज्यूसचे वाटप करण्यात आले. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सेवाभाव आणि सामाजिक सलोख्याचीही प्रचिती नागरिकांना अनुभवायला मिळाली.