राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त कंटेकुर येथे जनजागृती प्रभातफेरी

 मुरूम, ता. उमरगा, दि. २७  : 

कंटेकुर, ता. उमरगा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंटेकुर यांच्या वतीने गावात जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. 

या प्रभातफेरीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ तसेच स्थानिक मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभातफेरीची सुरुवात शाळेपासून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी "प्रत्येक बालकाला दोन थेंब–पोलिओला कायमचा अंत", "पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करूया", "दोन थेंब जीवनाचे, प्रत्येक बालकासाठी सुरक्षिततेचे" अशा विविध घोषणांद्वारे गावकऱ्यांमध्ये पोलिओ लसीकरणाबाबत जनजागृती केली. प्रभातफेरी गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली. यावेळी लक्ष्मीकांत पटणे यांनी गावातील नागरिकांना २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिनाची माहिती दिली. तसेच ग्रामीण भागात २९ जून ते २ जुलै २०२६ दरम्यान आणि त्यानंतर ४ जुलै २०२६ रोजी घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार असल्याचे सांगितले. 

पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे अत्यंत आवश्यक असून कोणतेही बालक या मोहिमेपासून वंचित राहू नये, असे आवाहन करण्यात आले.
प्रभातफेरीनंतर उपस्थित ग्रामस्थांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व, पोलिओ रोगाचे दुष्परिणाम आणि लसीकरणामुळे मिळणारे संरक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गावातील नागरिकांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन केले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र समन, लक्ष्मण येवते, लतिफ लदाफ, जीवन सूर्यवंशी, विजयकुमार कलशेट्टी, चित्ररेखा दंडे, तनुजा गाढवे व लक्ष्मीबाई शिकारे, ग्रामपंचायत सदस्य, आशा व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंटेकुर यांच्या वतीने करण्यात आले.
 
Top