बनावट ॲपचा मायाजाळ; तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्याला तब्बल ६३.६५ लाखांचा गंडा!
‘एआय ट्रेड’च्या नावाखाली मोठी ऑनलाइन फसवणूक; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
नळदुर्ग, दि. २३ जून :
जलद नफा आणि गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याला तब्बल ६३ लाख ६५ हजार रुपयांचा आर्थिक चुना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट मोबाईल ॲप तयार करून त्याद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवत ही कोट्यवधींच्या उंबरठ्यावर पोहोचलेली फसवणूक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एआय ट्रेड या कंपनीचे मालक गणेशराव रमेश गोपाळे आणि शांतनु रमेश गोपाळे (रा. बोरगाव नांदू, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्यादी सिद्राम यशवंत साखरे (वय ५०, रा. उमरगा चि., ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांना मोठ्या नफ्याचे स्वप्न दाखवून आपल्या जाळ्यात ओढले.
आरोपींनी विशेष बनविलेल्या एका ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. या भूलथापांना बळी पडलेल्या साखरे यांनी विविध व्यवहारांद्वारे नेट बँकिंगच्या माध्यमातून मोठ्या रकमा जमा केल्या. मात्र प्रत्यक्षात कोणतीही गुंतवणूक न होता त्यांची ६३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.
ही घटना दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० ते १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फसवणुकीची खात्री झाल्यानंतर सिद्राम साखरे यांनी सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे सायबर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३२०, ३२१, ३३५, ३३६, ३४० तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी) व ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, ऑनलाइन गुंतवणूक, शेअर ट्रेडिंग आणि ‘जलद श्रीमंत व्हा’ अशा योजनांच्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांनी कोणत्याही अनोळखी ॲप, संकेतस्थळ किंवा गुंतवणूक योजनेवर विश्वास ठेवण्यापूर्वी संपूर्ण पडताळणी करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.