तुळजापूर : अणदूर, नळदुर्ग होर्टी येथिल
कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; नऊ परवाने निलंबित
तुळजापूर, दि. २३ :
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांच्या तपासणी मोहिमेला वेग दिला असून तुळजापूर तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तपासणीत विविध त्रुटी आढळून आल्याने संबंधित केंद्रांचे बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्रीचे एकूण नऊ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांकडून खतांच्या गुणवत्तेबाबत व विक्रीतील अनियमिततेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील अणदूर, नळदुर्ग आणि होर्टी परिसरातील कृषी सेवा केंद्रांची कृषी विभागाच्या निरीक्षकांनी सखोल तपासणी केली. यामध्ये ओंकार कृषी सेवा केंद्र, अणदूर, शुभम कृषी सेवा केंद्र, होर्टी आणि ओंकार कृषी सेवा केंद्र, नळदुर्ग येथे नियमांचे उल्लंघन व विविध त्रुटी आढळून आल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
कृषी विभागाने संबंधित केंद्रांकडील संशयित खतांचे नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित खतांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना निकृष्ट किंवा संशयास्पद खतांचा फटका बसू नये, यासाठी विभागाने खबरदारी घेतली आहे.
तपासणी मोहीम सुरूच राहणार
कृषी विभागाच्या माहितीनुसार, आगामी काळातही जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू राहणार आहे. बियाणे, खते व कीटकनाशक विक्रीसंदर्भातील कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
खतांची जादा दराने विक्री करणे, शेतकऱ्यांना अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी सक्ती करणे (लिंकिंग), साठा नोंदवही अद्ययावत न ठेवणे, दरफलकावर उपलब्ध साठ्याची माहिती न दर्शविणे, परवान्यात नसलेल्या स्रोतांकडून मालाची खरेदी-विक्री करणे, शेतकऱ्यांना अधिकृत पावती न देणे, खरेदीची बिले उपलब्ध नसणे तसेच परवान्यात गोदामाचा समावेश नसणे अशा प्रकारच्या अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांना दक्ष राहण्याचे आवाहन
दरम्यान, शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना केवळ अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रांचीच निवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरेदीवेळी पक्की पावती घेणे, त्यावर उत्पादनाचा संपूर्ण तपशील आणि विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
अनुदानित रासायनिक खत खरेदी करताना ई-पॉस मशीनवरील बिल घेणे, खताच्या पिशवीवरील किंमत आणि बिलातील किंमत पडताळणे, तसेच बियाण्यांचे टॅग, पिशवी आणि नमुना हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवण्याचा सल्लाही विभागाने दिला आहे. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करून अंतिम मुदत तपासावी आणि नामांकित कंपन्यांची उत्पादनेच खरेदी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राजकुमार मोरे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव