ब्राह्मण कल्याण ट्रस्ट आयोजित गुणगौरव सोहळा उत्साहात
धाराशिव, दि. ७ :
ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिवच्या वतीने रविवार, ७ जून रोजी येथील परिमल मंगल कार्यालयात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. सिध्दीविनायक उद्योग समुहाचे अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, उद्योजक प्रदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सोहळ्यात १० वी, १२ वीमधील सुमारे ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच समाजातील महिला नगरसेविका दिपाली धनंजय पाटील यांच्यासह सुनंदा मुकूंद जोशी, स्वरा धनंजय जेवळीकर, अमित अंबादास दानवे, ओकांर उमाकांत देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्ता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी असेच सातत्यपूर्ण प्रयत्न करत शिक्षण, संस्कार आणि कर्तृत्वाच्या बळावर समाजाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रा. मिलींद जोशी यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आरोग्यासह शारिरीक व बौध्दीक आरोग्याकडे लक्ष द्यावे. तसेच सध्या मोबाईलसह डिजीटल उपकरणांच्या वाढत्या वापराबद्दल चिंता व्यक्त करत एक दिवस डिजीटल उपवास करण्याची गरज असल्याचे प्रा. मिलींद जोशी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश कुलकर्णी, सूत्रसंचालन डॉ. स्वप्नगंधा कुलकर्णी, अपर्णा पाठक तर उपस्थितांचे आभार अंजली पाथरुडकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.