नळदुर्ग नगरपालिकेच्या लेखा विभागातील कथित गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी; दोषींवर कठोर कारवाईची मागणी तीव्र
नळदुर्ग, दि. ३० जून :
नळदुर्ग नगरपालिकेच्या लेखा विभागातील कथित आर्थिक गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
मागील आर्थिक वर्षांतील नगरपालिकेचे मंजूर अंदाजपत्रक (बजेट) व सुधारित अंदाजपत्रकाची तपासणी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याच कालावधीत विविध विभागांमार्फत झालेल्या खर्चाचा तपशील, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करून करण्यात आलेल्या कामांची शहानिशा, तसेच संबंधित कामांची गुणवत्ता व आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
याशिवाय ठेकेदार व पुरवठादारांना अदा करण्यात आलेल्या देयकांचे धनादेश, बिले, व्हाउचर तसेच सर्व आर्थिक नोंदींची तपासणी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या सर्व बँक खात्यांमधील शिल्लक रक्कम, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण (ऑडिट) अहवाल, त्यातील हरकती आणि त्या हरकतींवर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, याचाही खुलासा करण्याची मागणी होत आहे.
राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या विविध योजनांतील अनुदानाचा नेमका उपयोग कोणत्या कामांसाठी करण्यात आला, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि मानधनावर झालेला एकूण खर्च, तसेच मालमत्ता कर, पाणी कर आणि इतर करांमधून जमा झालेल्या महसुलाचा विनियोग कोणत्या विकासकामांसाठी करण्यात आला, याचीही चौकशी व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
यासोबतच नगरपालिकेच्या कर थकबाकीदारां विरोधात प्रशासनाने कोणती कारवाई केली, थकबाकी वसुलीची स्थिती काय आहे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता का राखली गेली नाही, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, लेखा विभागातील कथित आर्थिक अनियमिततेस जबाबदार असलेल्या तत्कालीन आधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे आता स्थानिक नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांचेही लक्ष लागले असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपालिकेच्या अंदाजपत्रकाविरोधात काँग्रेसचा लढा कायम
नळदुर्ग नगरपालिकेच्या अंदाजपत्रकास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध नोंदवत ते प्रथम स्थायी समितीत मांडून नंतर सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्याची मागणी लेखी व तोंडी करुन हा विषय प्रोसिंडिगवर घेण्याची मागणी केली होती. मात्र नगराध्यक्षांनी ती मागणी डावलून अंदाजपत्रक मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंदाजपत्रकातील आक्षेपार्ह बाबींविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आले असून ते पुढे विभागीय आयुक्त, संभाजीनगर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. नगरपालिकेतील गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी विरोधी पक्षाचा पाठपुरावा सुरूच राहील, असे काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे यांनी सांगितले.