"वाघाच्या स्वागताची गर्जना की राजकीय संकेत?" एक बॅनर, अनेक अर्थ; धाराशिवच्या राजकारणात नवा ट्विस्ट

तुळजापुरातील बॅनरबाजीने धाराशिवच्या राजकारणात खळबळ

धाराशिव, दि.२० जुन :

राजकारणात कधी कोण कुणाच्या तंबूत जाईल, याचा नेम नसतो. मात्र तुळजापूर शहरात झळकलेल्या एका बॅनरने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा फड रंगवला आहे. "वाघ चालला वाघाच्या कळपात" असा दमदार संदेश देत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्वागताचे बॅनर शहरात झळकल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षबदलाच्या चर्चांनी आधीच जोर धरला असताना, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेल्या या बॅनरने चर्चेला आणखी खतपाणी घातले आहे. "स्वागत" या एका शब्दामागे नेमका राजकीय संदेश काय दडलेला आहे, याचीच चर्चा सध्या चौकाचौकात रंगताना दिसत आहे.
विशेष म्हणजे हे बॅनर शिंदे गटाचे तालुकाप्रमुख अमोल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा केवळ सदिच्छांचा भाग आहे की आगामी राजकीय घडामोडींची झलक, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अनेक नेत्यांच्या हालचालींकडे लक्ष लागलेले असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नावही चर्चेत आहे. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी तुळजापुरातील या बॅनरने "धूर आहे म्हणजे आग कुठेतरी असेलच!" अशी कुजबुज सुरू केली आहे.
राजकीय दृष्ट्या आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व घडत आहे ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघात. त्यामुळे या बॅनरबाजीचा अर्थ केवळ स्वागतापुरता मर्यादित आहे की नव्या राजकीय समीकरणांची रंगीत तालीम, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अधिकृत पडदा अद्याप उघडलेला नसला तरी तुळजापुरातील या एका बॅनरने धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. आता सर्वांचे लक्ष आहे ते पुढील काही दिवसांत होणाऱ्या हालचालींकडे.


बॅनरमागचा संदेश नेमका कोणासाठी?
स्वागताच्या निमित्ताने राजकीय समीकरणांची चाहूल

तुळजापुरातील बॅनरने वाढवली पक्षबदलाच्या चर्चेची धग


 
Top