फर्निचर दुकानाचा पत्रा फोडून चोरट्यांचा धुमाकूळ!

जळकोटमध्ये ८.११ लाखांच्या मालावर "मध्यरात्री चोरट्यांचा महासफाया ; एलईडी टीव्हींसह तांब्या-पितळेचा ऐवज लंपास, व्यापाऱ्यांमध्ये खळबळ; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

नळदुर्ग, दि. २० जुन:


जळकोट येथील 'न्यू लक्ष्मी भांडी स्टोअर्स अँड फर्निचर' या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी डल्ला मारत तब्बल ८ लाख ११ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करत टीव्ही, तांब्या-पितळेची महागडी भांडी आणि इतर साहित्यावर हात साफ केला. या घटनेमुळे जळकोटसह परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, अभंग तुळशीराम घोटकर (वय ४८, रा. शिवाजी चौक, लोहारा) यांचे जळकोट येथे 'न्यू लक्ष्मी भांडी स्टोअर्स अँड फर्निचर' हे दुकान आहे. दि. १७ जून रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते दि. १८ जून रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा काढून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानातील ९ एलईडी टीव्ही, २० बाजाज कंपनीचे मिक्सर, १५ तांब्याच्या घागरी, १५ कळश्या, २७० पितळी देवमूर्ती, ४० पितळी टोपल्या, ६६ पितळी वाट्या तसेच तांब्या-पितळेच्या विविध वस्तू असा एकूण ₹८,११,७२० किमतीचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी अभंग घोटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे.

▪️ चोरीचा थरार एका नजरेत

🔴 चोरी गेलेला मुद्देमाल : ₹८,११,७२०🔴 घटनास्थळ : न्यू लक्ष्मी भांडी स्टोअर्स अँड फर्निचर, जळकोट🔴 चोरीची पद्धत : दुकानाचा पत्रा उचकटून प्रवेश🔴 लंपास माल : एलईडी टीव्ही, मिक्सर, तांब्या-पितळेची भांडी व देवमूर्ती🔴 गुन्हा दाखल : नळदुर्ग पोलीस ठाणे🔴 कलमे : भा.न्या.सं. ३३१(४), ३०५(अ)

 
Top