डी. फार्मसीत विद्यार्थिनींची सरशी; मुरूमच्या कॉलेजचा निकाल ९५ टक्क्यांपार
माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीची उज्ज्वल परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार
मुरूम, दि.. २० जुन :
येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीने यंदाही शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा उंचावत डी. फार्मसी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या निकालात विद्यार्थिनींनी वर्चस्व गाजवत महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे.
महाविद्यालयाचा डी. फार्मसी प्रथम वर्षाचा निकाल तब्बल ९२.३० टक्के, तर द्वितीय वर्षाचा निकाल ९५.२३ टक्के लागला आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सन २०२५-२६ च्या डी. फार्मसी प्रथम वर्षाच्या परीक्षेत हुमा बेगम लोणी हिने ८४.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. प्रिया कांबळे (७४.५० टक्के) हिने द्वितीय, तर सुपिया शेंडगे (७१.६० टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
तर सन २०२४-२५ च्या डी. फार्मसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत मुस्कान कारभारी हिने ८८.१८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत यशाचा मान मिळविला. आरती दुधभाते (८०.५५ टक्के) द्वितीय, साक्षी पाटील (८०.३६ टक्के) तृतीय, वैष्णवी कटारे (७३.९१ टक्के) चतुर्थ आणि शितल कटारे (७३.४६ टक्के) पाचव्या क्रमांकावर राहिली.
या यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार शनिवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, नगरसेवक सूर्यकांत जाधव, प्रा. डॉ. रवि आळंगे, उपप्राचार्य योगेश पाटील यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या भावी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
फोटो ओळ : मुरूम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, नगरसेवक सूर्यकांत जाधव, प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, प्रा. डॉ. रवि आळंगे व अन्य मान्यवर.