शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ८ जुलैला नरिमन पॉईंटवर जलसमाधी आंदोलन
नळदुर्ग ,दि.२५ जुन:
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येत्या ८ जुलै रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपर तहसीलदार, नळदुर्ग यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर व तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. शासनाने तातडीने शेतकरी कर्जमाफी जाहीर करून पात्र शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित पीकविमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी, तसेच केंद्र सरकारच्या धान्य वाटप योजनेतील थकीत रक्कम अदा करून धान्याऐवजी रोख स्वरूपात मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय बंद करण्यात आलेली पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, साखर कारखान्यांकडे थकीत असलेली उसाची बिले तातडीने अदा करावीत, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या शालेय व उच्च शिक्षणाचे शुल्क माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात नळदुर्ग-अक्कलकोट मार्गावरील आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वी नळदुर्ग येथे ट्रॅक्टर मोर्चाद्वारे आंदोलन केले होते. मात्र, मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्याने आता नरिमन पॉईंट येथे जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील, असा इशाराही शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
महादेव बिराजदार, पंडित पाटील, अशोक पडोळे, संतोष फडतरे, गुलाब शिंदे, महेश घोडके, आजमुद्दीन शेख, बालाजी ठाकूर, रेहमान शेख, काशिनाथ काळे, प्रतापसिंह ठाकूर, श्रीकांत पोतदार ,गणपत सुरवसे, महेश घोडके,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत