धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई;  जुगार अड्ड्यावर छापा, तब्बल ५९ जणांवर गुन्हे दाखल; सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव, दि. २५ जुन : 

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत कळंब परिसरातील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ५९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील आजवरची ही सर्वात मोठी जुगारविरोधी कारवाई मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रीतू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, परिमंडळ पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. कळंब-ढोकी रोडवरील हॉटेल हिमालय बार शेजारी असलेल्या ‘संदीप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ’ येथे क्लब परवान्याचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर तीन पत्ती (तिरट) जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी अत्यंत गुप्तपणे नियोजन करून रात्रीच्या वेळी अचानक धाड टाकली. छापेमारीदरम्यान जुगार खेळणारे अनेक जण रंगेहात आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ५४ जणांना ताब्यात घेतले असून, जुगार खेळणारे तसेच क्लबचे पाच संचालक अशा एकूण ५९ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने असा एकूण १९ लाख ९६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे जुगार व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

या यशस्वी मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच आरसीपी (RCP) आणि क्यूआरटी (QRT) विशेष पथकातील अधिकारी, अंमलदार व चालक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, जिल्ह्यातील अवैध जुगार, मटका, हातभट्टी दारू व अमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबविली असून, अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात यापुढेही गोपनीय आणि प्रभावी कारवाया सुरू राहतील. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.
 
Top