नळदुर्गच्या आठवडी बाजारातील समस्यांवर सकारात्मक तोडगा; महिला स्वच्छतागृहासह सुविधांसाठी आश्वासन

नळदुर्ग, दि. २५ जून :

नळदुर्ग येथे रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील स्वच्छता, महिला स्वच्छतागृह व व्यापारी-शेतकरी यांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्यांबाबत नगरपालिका प्रशासन आणि व्यापारी मंडळाच्या शिष्टमंडळामध्ये झालेली चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. बाजारातील गैरसोयी दूर करण्यासाठी लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी दिली.

नळदुर्ग शहरातील आठवडी बाजारातील विविध समस्या आणि नागरिकांना होत असलेल्या गैरसोयींबाबत “तुळजापूर लाईव्ह”ने सातत्याने आवाज उठविला होता. त्यानंतर गुरुवार, दि. २५ जून रोजी व्यापारी मंडळाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यरपाशा जहागिरदार आणि मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी व्यापारी मंडळाच्या वतीने महिला स्वच्छतागृहाची उभारणी, बाजारपेठेतील शेतकरी व व्यापाऱ्यांच्या जागेचा प्रश्न, स्वच्छता व्यवस्था यांसह विविध मागण्या मांडण्यात आल्या. यावर सकारात्मक चर्चा करून महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न पुढील तीन महिन्यांत मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

तसेच ऐतिहासिक किल्ला गेट ते भवानी चौक या परिसरात आठवडी बाजार भरविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. बाजार परिसरात स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून बाजाराच्या दिवशी चारचाकी व दुचाकी वाहनधारकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई केली जाणार आहे. येत्या रविवारी दवंडी देऊन भाजी विक्रेते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नव्या व्यवस्थेबाबत माहिती देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि व्यापारी वर्ग यांनी एकत्रितपणे संवाद साधत शहराच्या विकासासाठी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक पावले उचलल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

या बैठकीस नगरसेवक तानाजी जाधव, रिजवान काझी, शशिकांत पुदाले, सुधीर पोतदार, मारुती खारवे, आकाश कुलकर्णी, बंजारा समाजाचे प्रतिनिधी रवी महाराज राठोड, संजय जाधव तसेच व्यापारी मंडळाचे सतीश पुदाले, मुकुंद नाईक, दयानंद स्वामी, सुभाष कोरे, संदीप सुरवसे, राजेंद्र महाबोले, अतुल हजारे, सय्यद सावकार, मारुती घोडके, जमन ठाकूर आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.

 
Top