नळदुर्ग येथील हुतात्मा बाबूराव बोरगावकर माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना एसटी पासचे वितरण
नळदुर्ग, दि. २५ जून : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विद्यार्थी हिताच्या उपक्रमांतर्गत हुतात्मा बाबूराव बोरगावकर माध्यमिक शाळा, साखर कारखाना, नळदुर्ग येथे विद्यार्थ्यांना मोफत व रोखीच्या एसटी पासचे प्रत्यक्ष शाळेत जाऊन वितरण करण्यात आले.
विभाग नियंत्रक अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मधुरा जाधव तसेच तुळजापूर आगार प्रमुख महेश रामपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नळदुर्ग एसटी स्थानकाचे वाहतूक नियंत्रक अनिल हांडे, गुंडू डुकरे, मुकुंद वैद्य व महेश डुकरे यांनी शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शंभर टक्के सवलत योजनेअंतर्गत मोफत पास तसेच रोखीचे एसटी पास वितरित केले.
विद्यार्थ्यांना एसटी स्थानकावर जाण्याची गरज भासू नये आणि त्यांचा वेळ वाचावा, या उद्देशाने शाळेतच जाऊन पास वितरण करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनीही समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक मोहन भोसले, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार नरवडे, उमाकांत मोरे, सहशिक्षक सुधाकर सुभेदार, नरवीर वीरसंगप्पा, श्रीमती छाया कामशेती, श्रीमती शुभांगी भोकरे, स्वामी मल्लय्या शंकरय्या, ज्ञानेश्वर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.